आशिष शेलार हे शरद पवार आणि संजय राऊतांवर संतापले, म्हणाले – ‘तुमची तोंडं का शिवली आहेत ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  दिल्लीत प्रजासत्ताक दिनी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष झाला. त्यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. जवान आणि पोलिसांच्या समर्थनार्थ शरद पवार यांची फेसबुक पोस्ट का पडली नाही ? रोज वचवच करणारे संजय राऊत देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत? असे संतप्त सवाल शेलार यांनी उपस्थित केले.

मुंबईत प्रसारमाध्यमांना बोलताना शेलार म्हणाले, “हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध एक चकार शब्द काढला नाही. रोज वचवच करणारे संजय राऊत देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाही. कधी काळी आवश्यक असल्यावर फेसबुक पोस्ट टाकणारे शरद पवार साहेब तुमची पोस्ट जवान आणि पोलिसांच्या बाजूने का आली नाही? सर्व आंदोलनात अन्य लोकांचा जो वावर होता त्याचे समर्थक शरद पवार आणि संजय राऊत तुम्ही आहात. तुमची तोंड आता का शिवली आहेत हा प्रश्न आम्ही देशवासीयांच्या वतीने विचारत आहोत.”

“केवळ राजकीय सुडापोटी आणि मोदी द्वेषापोटी या देशात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुर्दैवाने शिवसेना अराजकता आणू पाहत आहे. देश यांना सोडणार नाही. जवान असो किंवा दिल्ली पोलीस या सर्वानी जो संयम दाखवला तो त्यांच्या देशभक्तीचा परिचय होता. विरोधकांना गोळीबार हवा होता का? आंदोलन चिघळल का होत? त्यामुळे माथी भडकवण्याचे काम शरद पवार यांच्याकडून अपेक्षित नाही,” असा संताप शेलार यांनी व्यक्त केला.

शेतकरी चर्चा करण्यास नकार देत आहेत, असे विचारले असता शेलार म्हणाले, “न्यायालयात केस आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही ऐकणार नाही, समितीसमोर जाणार नाही, समितीच्या सदस्यांवर आम्ही प्रश्न विचारू..तासंतास आणि कित्येक दिवस कृषिमंत्री नम्रपणे चर्चा करत असताना हेटाळणी केली जात आहे. हे सगळं कशाचं द्योतक आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संयमाची भाषा करु नये. माथेफिरूचे समर्थक म्हणून काम करु नये.”

“२००३ पासून ज्यांनी कृषी कायद्याची वकिली केली ते आज संयमाच्या चर्चेची गोष्ट करत आहेत. १४ वर्षानंतर तरी वनवास संपतो पवार साहेब..१७ वर्षे झाली कायदा आणून आणि चर्चा करुन अजूनही तुम्हाला चर्चा करायची आहे. याचा अर्थ चर्चेचं बांडगुळ हे दुतोंडी हत्यार हे महाराष्ट्र विकास आघाडीचे आहे,” असा निशाणा यावेळी शेलार यांनी साधला.