भाजपा नेते आशिष शेलारांचा शिवसेनेवर घणाघात, म्हणाले – ‘मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. लि कंपनी आहे काय ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   मुंबई महापालिकेतील विकास निधी वाटपावरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. लि. कंपनी आहे काय?, हा दुजाभाव मुंबईकरांसोबत करताय लक्षात असू द्या, असा सवाल करत शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केल आहे.

शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेत 650 कोटी विकास निधीपैकी शिवसेनेच्या 97 नगरसेवकांना 230 कोटी, भाजपच्या 83 नगरसेवक 60 कोटी, काँग्रेसच्या 29 नगरसेवक 81 कोटी आणि हो स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना एकट्याला 30 कोटी निधी देण्यात आला आहे. यावरून मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. लि.. कंपनी आहे काय? असा सवाल करत हा दुजाभाव मुंबईकरांसोबत करताय लक्षात असू द्या, असे म्हणत शेलार यांनी टीकास्त्र सोडल आहे. महापालिकेच्या सन 2020-21 च्या अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये मंजूर करताना 700 कोटीचा निधी नगरसेवकांच्या विकासकामांसाठी देण्यात आला आहे. तर सन 2021-22 मध्ये 650 कोटी रुपये दिले आहेत.

कोरोना काळात 1600 कोटी खर्च झाल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. मात्र यावेळेस अंतर्गत निधीतून कर्ज उचलणेही शक्य नसल्यामुळे आता शेअर बाजारातून कर्जरोख्यातून पैसे उभे करण्याचा पालिका प्रशासनाचा विचार सुरू आहे. मोठ्या प्रकल्पांसाठी 3 ते 4 हजार कोटी निधीची गरज भागवण्यासाठी हे पाऊल उचलले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, यावरून शेलार यांनी सत्ताधाऱ्यांवर याआधी जोरदार टीकास्त्र सोडले होते.