‘स्वतःच्या अहंकारातून मुंबईकरांचे अजून किती नुकसान करणार ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कांजूरमार्ग मधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्याने ठाकरे सरकारला मोठा दणका बसला आहे. त्याचसोबत भूखंड आहे त्याच स्थितीत ठेवावे असे आदेश उच्च न्यायालयाने ‘एमएमआरडीए’ला दिले आहेत. तोच धागा पकडून “स्वतःच्या अहंकारातून मुंबईकरांचे अजून किती नुकसान करणार,” असा सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, “आरेबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मान्य नाही. त्यानंतर कांजूरमार्गाचे मेट्रो कारशेड बाबत स्वतःच नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल मान्य नाही. आता उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय तरी मान्य करणार का? स्वतःच्या अहंकारातून अजून मुंबईकरांचे किती नुकसान करणार? अहंकार! अहंकार! आणि अहंकार!!,” असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे.

तर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी, “कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडवरुन उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांनी माफी मागावी,” अशी मागणी केली आहे.

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्णयावरुन विरोधकांकडून सुरु असलेल्या टीकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “विकासकामांत राजकारण करणे योग्य ठरणार नाही. यासंदर्भात कायदे आणि नियमांच्या अधीन राहून काय पावले टाकता येतील, याचा निर्णय राज्याचे प्रमुख आणि महाविकास आघाडी सरकार घेईल. कोणत्याही न्यायालयाच्या निर्णयाबाबत दाद मागण्याची तरतूद आहे. यामुळे आम्ही या निर्णयाविरुद्ध दाद मागू,” असे त्यांनी सांगितलं.