भाजपाकडून अण्णा हजारेंना पत्र, सांगितलं ‘दिल्लीला वाचवा’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – सामाजिक कार्यकर्ते आणि भ्रष्टाचारविरुद्ध आवाज उठवणारे अण्णा हजारे यांना भाजप दिल्लीचे अध्यक्ष आदर्श गुप्ता यांनी सोमवारी पत्र लिहिले आहे. आम आदमी पार्टी भ्रष्टाचारात सामील आहे, तुम्ही दिल्लीत येऊन हे लोकांना सांगत दिल्लीला वाचविण्याचे आवाहन केले आहे.

तुमच्या नेतृत्वात आपने भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविला होता. आज तोच पक्ष स्वतः त्यात सामील आहे. आम्हाला आठवते की 5 एप्रिल 2011 रोजी तुम्ही दिल्लीच्या रामलीला मैदानावर भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आणि जनलोकपाल विधेयकाची मागणी करुन तत्कालीन सरकारविरूद्ध आमरण उपोषण केले होते. तुमच्या आंदोलनाला दिल्लीसह देशभरातील कोट्यावधी लोकांनी पाठिंबा दिला होता.

त्यानंतर तुमच्याच नावाने काही लोकांनी स्वच्छ राजकीय व्यवस्थेची बाजू मांडत, निवडणुका लढवल्या आणि अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून आम आदमी पक्षाची राजकीय पक्ष म्हणून स्थापन केली. सरकार स्थापन झाल्यानंतर प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, प्राध्यापक आनंद कुमार, कुमार विश्वास यांचे खरे चेहरे लोकांसमोर आले. सोमनाथ भारती असो की संदीप कुमार, अमानतुल्ला खान किंवा जितेंद्र तोमर या नावांची यादी लांबलचक आहे. खोटी आश्वासने, खोटे हेतू आणि जातीय राजकारणाच्या आधारे पुन्हा सत्तेत आल्यानंतर दिल्लीतील लोकांना आपने केलेल्या जातीय दंगलींचा सामना करावा लागला असल्याचे म्हटले आहे.