भाजपच्या आत्मनिर्भर यात्रा मार्गावर स्वाभिमानीचे ‘कडकनाथ’ आंदोलन

सांगली: पोलीसनामा ऑनलाईन – कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ भाजप व रयत क्रांती संघटनेने सुरू केलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडकनाथ घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करीत प्रत्युत्तर दिले आहे. कडकनाथ घोटाळ्यात फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना आ. सदाभाऊ खोत यांनी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि.27) यात्रा मार्गात कडकनाथ कोंबड्या सोडून आंदोलन केले. या प्रकरणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह 15 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रयत क्रांती संघटना आणि भाजपच्यावतीने केंद्राच्या कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात किसान आत्मनिर्भर यात्रा काढण्यात येत आहे. इस्लामपूरमध्ये आज सायंकाळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या यात्रेचा समारोप होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यात्रेला जोरदार विरोध दर्शवला आहे. आत्मनिर्भर यात्रेला विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रविवारी सकाळी शहरातील स्टेशन चौकात एकत्र जमले होते. याची माहिती मिळताच स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह 15 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. घेतले. तत्पूर्वी कार्यकर्त्यांनी कडकनाथ कोंबड्यांसह आंदोलन केले. कृषी कायद्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत नवे कायदे मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान, रविवारी सायंकाळी इस्लामपूरमध्ये होणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतही स्वाभिमानीचे कार्यकर्ते गोंधळ घालण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर नजर ठेवली आहे.