ममता बॅनर्जींना भाजप नेत्यांचा इशारा, म्हणाले – ‘या हिंदूविरोधी राजकारणाचे आम्ही चोख उत्तर देऊ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु झाला. त्याचे पडसाद आता उमटू लागले असून या हिंसाचाराला तृणमूल काँग्रेसच जबाबदार असल्याचे भाजपसह इतर नेत्यांनी म्हंटले आहे. भाजपने तृणमूलला लक्ष करत काही दिवसांत ११ कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनीही संताप व्यक्त केला आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ममता बॅनर्जींवर निशाणा साधला. ते म्हणाले, भाजप कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्ये मारले जात आहे. कथित मानवतावादी, लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्षतावादी भामटे तोंड आवळून बसलेत. ममता बॅनर्जींच्या आरत्या ओवाळल्या जातायत, लक्षात ठेवा तो दिवस दूर नाही, या हिंदूविरोधी राजकारणाचे आम्ही चोख उत्तर देऊ. जनता देईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील परिस्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपाल जगदीप धनकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून घेतला. यावेळी मोदी यांनी हिंसाचाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे राज्यपालांनी सांगितले.

जे. पी. नड्डा बंगालमध्ये

मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा बंगालमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी राज्यात तृणमूल कॉंग्रेसच्या विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना हिंसाचाराचा सामना करावा लागत असल्याचे सांगितलं. इथला हिंसाचार देशाच्या फाळणीवेळच्या हिंसाचाराचे स्मरण करून देणारा आहे. निवडणुकोत्तर काळात मी असा हिंसाचार कधी पाहिला नाही. तृणमूल काँग्रेस हा असहिष्णू पक्ष असून भाजप लोकशाही मार्गाने विचारांची लढाई लढण्यास कटिबद्ध असल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केले.

भाजपा सर्वोच्च न्यायालयात

भाजप नेते गौरव भाटिया सर्वोच्च न्यायालया एक याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि बलात्काराच्या घटनांची सीबीआय चौकशी त्याचबरोबर हिंसाचार घडविणाऱ्यांवर काय कारवाई झाली, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.