शिवसेनेला भाजपा दाखवू लागलं ‘ही’ भीती !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेवर दबाव टाकण्यासाठी आता भाजपाने नवी खेळी सुरु केली आहे. जर योग्य मुदतीत कोणतेच सरकार स्थापन होऊ शकले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट आणावी लागेल, असे सांगत भाजपाने शिवसेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

निकाल लागून एक आठवडा झाला असून काँग्रेस वगळता तीनही प्रमुख पक्षांनी आपल्या विधीमंडळ नेत्याची निवड केली आहे. भाजपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड केली आहे. तरीही त्यांच्याकडे आजमितीला बहुमताचा आकडा नाही. त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापन करण्याचा दावा अद्याप राज्यपालांकडे केला नाही़ पाच वर्षापूर्वी ३१ ऑक्टोबरला देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. निवडणुक आयोगाने राज्यपालांना निवड झालेल्या आमदारांची यादी सादर केली आहे. परंतु, अद्याप कोणीही सत्ता स्थापन करण्याचा दावा केला नाही़ जर योग्य वेळेत सत्ता स्थापन करण्याचा दावा कोणीही केला नाही.

याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, भाजपा शिवसेनेला एकत्रित जनादेश मिळाला आहे. दोघांनी एकत्रितपणे निवडणुक लढविली आहे. आमच्या प्रत्येक बॅनर्सवर दोन्ही नेत्यांचे फोटो असतात. दोन्ही पक्षांमध्ये अनेक तणावाचे प्रसंग आले तरीही आमची युती तुटली नाही. हा तिढा कसा सोडवता येईल, यावर निश्चितपणे चर्चा होईल.

हा प्रश्न भाजपा किंवा शिवसेनेचा नव्हे, तर महाराष्ट्राच्या जनतेचा आहे. जनतेची इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी युतीचे सरकार यावे हीच भावना आहे. चर्चेतल्या मुंद्द्यांच्या आधारावर अटी शर्थी घातल्या जातात. येत्या काही दिवसात १०० टक्के नवीन सरकार सत्तेवर येणार आहे. ठराविक कालावधीत सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपतींना हस्तक्षेप करावा लागेल. तर राष्ट्रपती शासन आणवे लागेल, असे त्यांनी सांगितले.

सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यातून भाजपाने शिवसेनेला इशारा दिला असून जर तुम्ही आमच्याबरोबर आला नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट आणू असे सांगत दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

Visit : Policenama.com