काय सांगता ! होय, चक्क भाजप नगराध्यक्षानेच केला CAA विरोधात ‘ठराव’, BJP चे 2 नेते पक्षातून ‘निलंबित’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा आणला. संसदेत तो मंजूरही करुन घेतला. त्याला देशभरात विरोध होत आहे. त्यावेळी भाजपाचे समर्थक त्याच्या समर्थनार्थ देशभर मोर्चे, रॅली काढत आहेत. मात्र, सेलू नगर परिषदेत अकरीत घडले. तेथे चक्क भाजपच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात नगर परिषदेत प्रस्ताव आणला व त्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या दोघांना पक्षातून निलंबित केले आहे.


नगराध्यक्ष विनोद हरीभाऊ बोराडे आणि उपनगराध्यक्ष बाळासाहेब रोकडे अशी त्यांची नावे आहेत.
परभणी जिल्ह्यातील सेलू या नगरपरिषदेत भाजपचे वर्चस्व आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विधानसभा निवडणुकीअगोदर काढलेल्या महाजनादेश यात्रेत विनोद बोराडे यांनी १८ नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. विनोद बोराडे हे भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचे कट्टर समर्थक आहेत.

असे असताना बोराडे यांनी सेलू नगर परिषदेच्या सभेत नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीला विरोध असल्याचा विषय मांडला. त्यावर सर्व नगरसेवकांनी चर्चा केली. त्यानंतर त्याला मंजूरी दिली. या ठरावावर २८ नगरसेवकांपैकी २६ नगरसेवकांनी स्वाक्षर्‍या केल्या. केवळ शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी सह्या केल्या नाहीत. मात्र, हा ठराव घेतल्याचे अत्यंत गुप्त ठेवण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी असा ठराव झाल्याचे बाहेर आल्याने एकच खळबळ माजली. त्यामुळे भाजप अडचणीत आली होती. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोघांना पक्षातून निलंबित केले आहे.