विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची यादी जाहीर, मेधा कुलकर्णींचा पत्ता कट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी शिरीष बोराळकर, पुणे पदवीधर मतदारसंघांसाठी संग्राम देशमुख, नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी संदीप जोशी, तर अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी नितीन धांडे यांच्या नावावर दिल्लीतून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

येत्या १ डिसेंबरला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार असून, ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून मागीलवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील यांना २ हजार मतांनी पराभूत केले होते. चंद्रकांत पाटील विधानसभेवर गेल्याने विधानपरिषदेची जागा रिक्त होती. त्यामुळे यंदा या जागेसाठी महापौर मुरलीधर मोहोळ, रवींद्र भेगडे, अभाविपचे राजेश पांडे यांनी तयारी केली होती. तसेच कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना ही उमेदवारी दिली जाईल, असे सांगितले जात होते. पण ऐनवेळी त्यांचा पत्ता कट करून सांगलीतील संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात मागीलवेळी भाजपचे शिरीष बोराळकर यांचा राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी पराभव केला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपने परत एकदा शिरीष बोराळकर यांच्यावर विश्वास टाकत संधी दिली आहे. शिरीष बोराळकर हे पंकजा मुंडे समर्थक म्हणून ओळखले जातात, त्यामुळेच या निमित्ताने पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघावर गंगाधराव फडणवीस, नितीन गडकरी या दिग्गज नेत्यांनी दीर्घकाळ प्रतिनिधित्व केलं आहे. विद्यमान आमदार अनिल सोले हे भाजपचे नागपूरचे महापौर होते. यंदाच्या वर्षी भाजपने संदीप जोशी यांना संधी दिली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात गेल्यावेळी शिक्षक आघाडी श्रीकांत देशपांडे यांनी शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष अरुण शेळके यांना पराभूत केले होते. शेळके यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा होता. दरम्यान, यंदा भाजपने या मतदारसंघातून नितीन धांडे यांना उमेदवारी दिली आहे.