Video : ‘हुशारी’ करू नका, ‘युपी’तून माणसं आणून कुत्र्यासारखं मारेन ; माजी महिला IPS अधिकारी, भाजप उमेदवाराची धमकी

तृणमूलच्या कार्यकर्त्यांना धमकी देतानाचा व्हिडीओ व्हायरल

कोलकत्‍ता : वृत्‍तसंस्था – पश्‍चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. राज्यात काही ठिकाणी दि. 12 मे रोजी मतदान होणार आहे. त्याच पार्श्‍वभुमीवर उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. राज्यात तृणमूल काँग्रेस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्‍का देण्यासाठी भाजपच्या बडया नेत्यांनी कंबर कसली आहे. कधीकाळी ममता बॅनर्जीच्या अतिशय निकटवर्तीय समजल्या जाणार्‍या माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांना भाजपने घाटल लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना थेट धमकी देत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने भारती घोष सध्या वादाच्या भोवर्‍यात अडकल्या आहेत.

स्वतःच्या घरात जा. जास्त हुशारी दाखवलीत, तर उत्‍तर प्रदेशातून माणसे बोलावून कुत्र्यासारखे मारेन अशी धमकी भारती घोष यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना दिली आहे. नेमकं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सौजन्यानं वागा, मर्यादा सोडू नका, असे आवाहन केल्यानंतरच घोष यांचा तो धमकीचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे पक्षाचे नेते पार्थ चॅटर्जी यांनी सांगितले आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून मागवला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने कोणाच्याही तक्रारीशिवाय भारती घोष यांच्या कृत्याची दखल घेतली आहे अशी माहिती सांगण्यात आली आहे.

भारती घोष यांनी नेमकी काय धमकी दिली
स्वतःच्या घरात जा. जास्त हुशारी दाखवण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्याकडे लपण्यासाठी कोणतीही जागा नाही. मी तुम्हाला घरातून बाहेर काढून कुत्र्यासारखं मारेल. तुम्हाला मारण्यासाठी उत्‍तर प्रदेशातून हजारो माणसे आणेन अशी धमकी भारती घोष यांनी तृणमूलच्या दोन कार्यकर्त्यांना दिली आहे.

कोण आहेत भारती घोष
भारती घोष या सन 2006 च्या बॅचच्या पश्‍चिम बंगाल केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांना दि. 15 ऑगस्ट 2014 रोजी सेवा पदक देखील मिळालेले आहे. सन 2014 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकी दरम्यान निवडणूक आयोगाने त्यांची दुय्यम स्थानावर बदली केली होती. निवडणूकीनंतर त्यांची पुन्हा पश्‍चिम मिदनापोरच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्‍ती करण्यात आली. घोष यांनी वेगवेगळया जिल्हयात तब्बल 6 वर्ष पोलीस अधीक्षकपद भुषविले. दुय्याम ठिकाणी नियुक्ती झाल्यानंतर घोष यांनी डिसेंबर २०१७ अखेरीस राजीनामा दिला. दरम्यान, फेब्रुवारी 2018 मध्ये पश्‍चिम मिदनापोरमधील दासपूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका खंडणी प्रकरणात त्यांच्याविरूध्द अटक वॉरंट काढण्यात आले.  दि. 4 फेब्रुवारी 2018 रोजी घोष यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहिर प्रवेश केला. लोकसभा निवडणूका जाहिर झाल्यानंतर भाजपने भारती घोष यांना घाटल लोकसभा मतदार संघातून उमेदवार दिली.