भाजपचा राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार कोण ? ‘ही’ 3 नावे सध्या चर्चेत

मुंबई : वृत्तसंस्था – राज्यसभेच्या तीन जागांवर भाजपकडून कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची निवड निश्चित मानली जात आहे. परंतु तिसऱ्या जागेसाठी भाजपचा उमेदवार कोण अशी चर्चा सध्या पक्ष पातळीवर सुरु झाली आहे. तिसऱ्या जागेसाठी अमर साबळे, भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे, माजी खासदार हंसराज आहिर, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा व भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांची नावे सध्या चर्चेत आहेत.

सातारा लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर उदयनराजे यांना राज्यसभेवर संधी देण्याबरोबरच त्यांना मंत्री पद मिळण्याची चर्चा आहे. तर रामदास आठवले यांचे देखील नाव राज्यसभेसाठी निश्चित मानले जात आहे. मागील वेळी आठवले यांनी भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. तिसऱ्या जागेसाठी साबळे आणि काकडे यांचा विचार झाला नाहीतर उदयनराजेमुळे काकडे तर आठवलेंमुळे साबळे यांना त्याग करावा लागू शकतो.

तिसऱ्या जागेसाठी विदर्भाला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सलग चारवेळा निवडून आलेले मात्र यावेळी पराभूत झालेले अहिर यांची तिसऱ्या जागेसाठी विचार केला जाऊ शकतो. विदर्भातील बहुजन चेहरा आणि पक्षातील स्थान यामुळे त्यांचा विचार होण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातून रहाटकर यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांनी महिला मोर्चाच्या अध्यक्ष असताना चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांचा विचार भाजपकडून केला जाऊ शकतो.