माढ्याची जागा भाजपच जिंकणार ; भाजप मंत्र्याने केला दावा

कराड : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशा राजकीय घडामोडी जास्त वेगात घडू लागल्या आहेत. राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना माढ्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी आपण पूर्ण ताकदीने माढ्यातून लढणार असून आम्हाला विश्वास आहे कि आम्ही भाजपचा उमेदवार या मतदारसंघातून निवडणून आणू असे सुभाष देशमुख म्हणाले आहेत.

शरद पवार यांच्या विरोधात तीव्र लढत देऊन भाजपच्या सुभाष देशमुख यांनी २००९ साली माढा मतदारसंघातून २ लाखापेक्षा अधिक मते मिळवली होती. आत्ता हि शरद पवार यांच्या विरोधात त्यांचेच नाव अधिक चर्चेत आहे. आपण शरद पवार यांच्या विरोधात निवडणुक लढणार का असा प्रश्न सुभाष देशमुख यांना विचारला असता त्यांनी त्या प्रश्नाला बगल दिली आहे.

पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडणुकीत विजयी बनवण्याचा आमचा संकल्प आहे. त्यामुळे कोणी ही उमेदवार असला तरी आम्ही त्याच्या प्रचाराचे काम करून त्याला निवडून आणण्याचे काम करू असे म्हणत सुभाष देशमुख यांनी मूळ प्रश्नाला बगल दिली. शरद पवार यांच्या विरोधात भाजप कोण उमेदवार देणार हा प्रश्न महत्वाचा बनत चालला आहे. तसेच या बाबत राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.