नाशिक महापालिकेत भाजपचा शिवसेनेला दणका, सेनेच्या उमेदवाराला पडले फक्त एकच मत, तेही स्वतःचेच

नाशिकः पोलीसनामा ऑनलाईन – नाशिक महापालिकेच्या शिक्षण समिती सभापती आणि उपसभापतिपदाची निवडणूक शुक्रवारी (दि. 6) पार पडली. निवडणुकीत भाजपच्या उमेदवार संगिता गायकवाड यांची शिक्षण समिती सभापतिपदी निवड झाली तर सेनेच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला. आश्चर्याची बाब म्हणजे, शिवसेनेच्या उमेदवाराला फक्त एकच मत मिळाले आहे. ते सुद्धा त्यांनीच आपल्या स्वतःला मतदान केले होते.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता ही निवडणूक पार पडली. महापालिकेच्या शिक्षण समिती सभापती आणि उपसभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपकडून संगीता गायकवाड, उपसभापतिपदासाठी शाहीन मिर्झा यांनी अर्ज भरला होता. तर शिवसेनेकडून ज्योती खोले यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु, सत्ताधारी भाजपकडे बहुमत असल्यामुळे संगीता गायकवाड आणि शाहीन मिर्झा यांची निवड निश्चित मानली जात होती. परंतु, शिवसेनेकडून ज्योती खोले यांनी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक झाली. यात अपेक्षेप्रमाणे संगीता गायकवाड यांचा विजय झाला आहे. तर खोले यांचा पराभव झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, ज्योती खोले यांना फक्त एकच मत मिळाले आहे. ते सुद्धा त्यांनीच आपल्याला मतदान केले होते.