Maratha Reservation : चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसच्या नेत्यावर निशाणा, म्हणाले – ‘अशोकराव, तुम्हाला जे जमलं नाही, त्याचं खापर…

पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राज्य सरकारने पारित केलेला मराठा आरक्षणाचा कायदा न्यायालयाने रद्द ठरवला आहे. या निर्णयाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटत आहे. महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाचा डाव सुरू झाला आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चव्हाणांना प्रत्युत्तर दिले आहे. अशोकराव, जे तुम्हाला जमल नाही, त्याचे खापर तुम्हाला देवेंद्रजींच्या डोक्यावर फोडता येणार नाही. तुम्ही सकार चालवताय ना ? मग जबाबदारी घ्या, असे पाटील यांनी म्हटले आहे.

ठाकरे सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत केंद्राकडे बोट दाखवत असताना चंद्रकांत पाटलांनी मात्र आरक्षणाचा चेंडू राज्य सरकारच्याच कोर्टात असल्याचा दावा केला आहे. 102 व्या घटनादुरुस्तीनुसार त्या त्या राज्याच्या मागास आयोगाने त्या राज्यातल्या एखाद्या जातीला मागास ठरवायचे. मग ते केंद्राच्या मागास आयोगाला पाठवायचे. मग त्यांनी ते राष्ट्रपतींना पाठवायचे. त्यानंतर पुन्हा कायदा राज्य सरकारनेच करायचा आहे. राज्य सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नसल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात मागास आयोग नाही. तो केंद्रात आहे. गायकवाड कमिशनची मुदत संपल्यानंतर नवीन मागास आयोगाची नियुक्ती केली नाही, आधी ती करा असे पाटील म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयातल्या 5 पैकी 2 न्यायाधीशांनी हे स्पष्ट केले आहे की, राज्याला कायदा करण्याचे अधिकार आहेत. उच्च न्यायालय, अॅटर्नी जनरल, लोकसभा आणि राज्यसभा यांनीही हे स्पष्ट केले आहे की, राज्याला अधिकार आहेत. मग हे वारंवार काय चाललय? एक तर यांना कायदा कळत नाही. 700 पानी निकालपत्र यांना नीट कळत नाही. राज्यातील जनता इतकी दूधखुळी नसल्याचे पाटील म्हणाले. वर्षानुवर्ष केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार असताना तुम्ही मराठा समाजाला आरक्षण का नाही दिले ? कारण तुम्हाला आरक्षण द्यायचे नव्हते अन् आजही द्यायचे नाही, असे पाटील म्हणाले.