…तर आम्ही शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास तयार : चंद्रकांत पाटील

पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या हितासाठी आपण आजही शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार आहे, असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

महत्त्वाचं म्हणजे, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत संवाद साधताना पुढील निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करण्याची सूचना दिली आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. पाटील एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास आपण तयार आहे. मात्र, शिवसेना आणि भाजप एकत्र आले तरी निवडणूक मात्र वेगवेगळे लढू, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेना सध्या खूप हवेत असून त्यांनी स्वर्गाला बोटं टेकली आहेत, असे वाटत आहे. अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच ते ऐकतील असे वाटत नसल्याचेही म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत युती करताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अमित शहा आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली होती. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या युतीबाबत आणि मुख्यमंत्रिपदाबाबतही चर्चा झाली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षात दावे-प्रतिदावे सुरू झाले.

मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे देण्याचा शब्द भाजप नेत्यांनी दिल्याचा दावा उद्धव ठाकरे वारंवार करीत होते, तर मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे देण्याचा शब्द दिला नव्हता, असे भाजप नेते सांगत होते. त्यामुळे अखेर शिवसेनेने युती तोडली आणि काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत राज्यात आघाडी सरकार स्थापन केले आहे.

महाराष्ट्रामध्ये आगामी काळात कोणाचीही मदत न घेता सरकार आणण्याच्या तयारीला लागा, अशा सूचना भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्यात.

पुढच्या वेळी एकट्याने महाराष्ट्र राज्य सांभाळण्याची आपली तयारी असली पाहिजे. याची तयारी आजपासूनच आपल्याला करायची आहे. कोणाचीही सोबत नाही, मदत नाही, असा संकल्प केला पाहिजे. एकटी भाजप महाराष्ट्रामध्ये कमळ आणणार आहे.

प्रत्येक ठिकाणी कमळ असेल यासाठी कामाला लागावे. पक्षाचा प्रत्येक उमेदवार जिंकेल, यासाठी प्रयत्न करा, असेही जे. पी. नड्डा यांनी सांगितले आहे.