“कुणाचाही ‘बाप’ काढला नाही, सहज वापरलेला शब्द” हे यांना कळत नाही का ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना ”आम्ही तुमचे बाप आहोत” असे म्हणाले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी “चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढण्याची भाषा सारखी करत आहात” असा प्रतिहल्ला चढवला होता. यानंतर आता ‘बाप’ हा सहज वापरला जाणारा शब्द असून कुणाचाही ‘बाप’ काढला नाही असं पाटील यांनी म्हटले आहे.

या प्रकरणावर आधिक भाष्य करताना पाटील यांनी “बापाची पेंड हा सहजपणे वापरला जाणारा शब्द आहे. त्या शब्दाचा मी वापर केला. त्यातून कुणाचाही बाप काढायचा नव्हता. मी कुणाचाही बाप काढला नाही” अशी सारवासारव केली आहे. त्याचबरोबर हा शब्द सहज वापरल्याचे देखील त्यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यावरून अंगावर येण्याची गरजच काय? असं देखील म्हटलं आहे. त्याचबरोबर या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर देखिल भाष्य केले. मराठीत अनेक शब्द सहजपणे वापरले जातात. त्यापैकी बाप हा सुद्धा एक शब्द आहे. तुमच्या बापाची पेंड आहे का? असं आपण सहज म्हणतो. पुणे प्रभाग समितीच्या निवडणुकीच्या संदर्भानं आम्हीही बाप आहोत असं मी म्हणालो. त्यातून कुणाचाही बाप काढायचा नव्हता. तसा माझा हेतूही नव्हता. अजित पवारांचाही बाप काढलेला नाही. हा सहज वापरलेला शब्द आहे. हे यांना कळत नाही का? त्यावरून अंगावर येण्याची गरजच काय?” असे म्हणत त्यांनी आपला मुद्दा मांडला.

राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत ट्विट केले. गेल्या दोन निवडणुकांमध्ये दिल्लीत कुणाचा बाप बसला आहे हे सर्वांनी पाहिलेलं आहे. आणि त्यांच्या वारसदारांची काळजी तुम्ही करू नये. विचारांनी सरळमार्गी असणाऱ्या लोकांचे अनेक वैचारिक वारसदार असतात. आणि तुमच्यासारख्या दृष्ट प्रवृत्तींना शह देण्यासाठी ते सदैव तत्पर राहतात, असे ट्विट करता राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांनी हे ट्विट करण्याच्या आधी शशिकांत शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जहरी टीका केली होती. शशिकांत शिंदे यांनी “चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषासारखे करत आहात, असे म्हटले होते. त्याचबरोबर शेतकरी विधेयकांवरून देखील त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. हे विधेयके कामगारांवर अन्याय करणारे असून फक्त मालक धार्जिणे आहेत. मोदी सरकारचे उद्योगपतींसाठी बाजारपेठ उभी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. सध्या मुंबई आणि देशातील मोठ्या उद्योगपतींना स्वतःची मोठी बाजारपेठ बनवायची असल्याची टीका देखील त्यांनी भाजपवर केली होती.