चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘राठोडांची हकालपट्टी करा अन्यथा…’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही महिन्यापासून मंत्र्यांशी संबंधित अनेक गुन्हे दाखल होत आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यात काहीच भूमिका घेत नाहीत. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. पूजा चव्हाण प्रकरणात जर मुख्यमंत्र्यांनी सोमवारच्या आत कडक भूमिका घेऊन संजय राठोड यांची हकालपट्टी केली नाही तर तोंड न उघडणाऱ्या या सरकारला, अधिवेशनातही तोंड उघडू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका पाटील यांनी घेतली आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे सुपुत्रच नव्हे तर प्रबोधनकारांचे नातू आहेत. महिला अत्याचारांवर ते शांत बसू शकत नाहीत, ते सत्यवचनी आहेत, असे म्हटले जात, पण व्यवहारात ते दिसत नसल्याचेही पाटील म्हणाले.

तसेच वानवडी पोलिसांनी काय काय तपास केला हे एकदा जाहीर करावे. वानवडी पोलिसांचा आतापर्यंत तपास नेमक्या कोणत्या दिशेने आहे, हे सर्वसामान्य जनतेला कळाले पाहिजे. आतापर्यंतच्या तपासावर पोलिसांनी ऑडिओ क्लिप मध्ये राठोड यांचे नाव पाहिले का?, असे सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांना आताच कसा त्रास द्यायला सुरुवात होतो. अनेक मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर कारवाई का नाही. चित्राताई वाघिणी सारख्या आहेत. त्या घाबरणाऱ्या नाहीत. चौकशीची भीती दाखवून त्यांना तुम्ही गप्प बसवू शकणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी ठाकरे सरकारवर केला.