पंतप्रधानांनी दिला धक्का : तिसऱ्या क्रमांकावर शपथ घेणाऱ्या शहांना केले ‘गृहमंत्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान मोदींच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळातील खाती जवळपास निश्चित झाली आहेत. मात्र मंत्रिमंडळाच्या शपथविधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपचे जेष्ठ नेते राजनाथ सिंग यांनी शपथ घेतली होती तर अमित शाह यांनी तिसऱ्या क्रमांकावर शपथ घेतली होती.

त्यामुळॆ मंत्रिमंडळात पंतप्रधानानंतर दुसऱ्या क्रमांकाचे असणारे गृहमंत्री पद राजनाथ सिंग यांनाच मिळणार अशी दाट शक्यता होती. परंतु आज झालेल्या खाते वाटपात तिसऱ्या क्रमांकावर शपथ घेणाऱ्या अमित शाह यांना दुसऱ्या क्रमांकाचे गृहमंत्री पद देण्यात आले आहे तर राजनाथ सिंग यांना संरक्षण मंत्रालयाचा कारभार देण्यात आला आहे. त्यामुले पंतप्रधान मोदी यांनी राजकीय मुत्सद्देगिरी दाखवत चांगलाच धक्का दिला असल्याचे बोलले जात आहे.

यात विशेष गोष्ट अशी आहे की, गुरुवारी झालेल्या शपथविधीतही मंत्र्यांच्या क्रमांकावर सस्पेन्स ठेवण्यात आले होते. 2014 च्या नरेंद्र मोदींच्या शपथविधीत राजनाथ सिंग यांनी पंतप्रधानानंतर लागलीच शपथ घेतली होती. त्यामुळे राजनाथ सिंगच गृहमंत्री होतील असे बोलले जात होते तर तिसऱ्या क्रमांकावर शपथ घेणारे अमित शाह यांना अर्थमंत्री केले जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आज मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले त्यात पंतप्रधान मोदींनी धक्का देत तिसऱ्यांदा शपथ घेणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना क्रमांक दोनचे म्हणजे गृहमंत्री पद दिले आहे.

केंद्रात ‘गुजरात मॉडेल’

अमित शहा यांना याआधीच गृहमंत्री पदाचा अनुभव आहे. शाह हे त्यांचे होमपीच असणाऱ्या गुजरातचे गृहमंत्री होते. खरं तर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी असताना अमित शहा यांना त्यांनीच गृहमंत्री केले होते. शाह 2003 ते 2010 या काळात गृहमंत्री या पदावर होते. आता केंद्रात अमित शाह त्याच भूमिकेत आलेले असून जी भूमिका त्यांनी गुजरातमध्ये पार पाडली होती . फरक फक्त राज्य आणि केंद्राचा आहे.