जेपी नड्डा यांच्या ताफ्यावरील हल्लाप्रकरणी 7 जणांना अटक, 3 FIR नोंद

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (BJP national president JP Nadda) यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली असून 3 एफआरआर नोंदवले आहेत. यात दगडफेकी प्रकरणी अज्ञात लोकांविरोधात दोन एफआयआर तर अन्य एक एफआयआर भाजपा नेता राकेश सिंह यांच्याविरोधातही नोंदवला गेला आहे. ज्यांच्यावर जमावाला भडकवण्याचा आरोप लावण्यात आला आहे.

पश्चिम बंगाल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेपी नड्डा यांच्या वाहन ताफ्याला झेड सुरक्षेशिवाय बंगाल पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा प्रदान केली होती. नड्डा यांचा ताफा जाणार त्या मार्गावर आणि कार्यक्रमस्थळी चार अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 8 पोलीस उपअधीक्षक, 8 पोलीस निरीक्षक, 30 पोलीस अधिकारी, 40 आरएएफ, 145 शिपाई, 350 सीव्हीचा बंदोबस्त होता. हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. याप्रकरणी गृहमंत्रालयाने राज्यपाल जगदीप धनखड यांच्याकडे पश्चिम बंगालची सद्यस्थिती व कायदा व सुव्यवस्थेविषयी सविस्तर अहवाल मागविला आहे. कोलकाताजवळील दक्षिण 24 परगण्यात जेपी नड्डा यांच्यासह भाजपाचे नेते डायमंड हार्बरला जात असताना दुपारी बाराच्या वाजेच्या सुमारास त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. दरम्यान नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावर ममता बॅनर्जी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मात्र सोशल मीडियावर नड्डांवरील हा हल्ला बनावट असल्याचा दावा केला आहे. राज्यात दाखल होणारे नेते आपापल्या उच्च दर्जाची सुरक्षा यंत्रणा सोबत घेऊन येतात. मात्र तरीही नेत्यांवर हल्ला कसा होऊ शकतो असा सवालही मोईत्रा यांनी उपस्थित केला आहे.

हल्ल्याची केंद्राने घेतली गंभीर दखल

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेला केंद्र सरकारने गंभीरपणे घेतले असून राज्यपाल जगदीप धनखड़ यांच्याकडून अहवाल मागविला होता. धनखड यांचा अहवाल मिळताच केंद्राने तातडीने बंगालचे डीजीपी आणि मुख्य सचिवांना दिल्लीला बोलवून घेतले असून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे संकेत राज्यपालांनी दिले आहेत. याच दरम्यान नड्डा यांच्या वाहन ताफ्यावर झालेल्या हल्याप्रकरणी आता कारवाई सुरू झाली आहे.