खुर्ची एवढी वाईट आहे का ? चित्रा वाघ म्हणाल्या – ‘उध्दव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर राठोडांना फाडून काढलं असतं’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन –   पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई होत नसल्याने भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर कठोर शब्दात टीकास्त्र सोडलं आहे. जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम सुरू आहे. राज्यातील तीन पक्षातील सरकारची एकी कधीच पाहिली पण आज एका बलात्काऱ्याला वाचवण्यासाठी तिन्ही पक्षाच सरकार एकत्र आले आहे. चुकीचा पायंडा महाराष्ट्रात पडत आहे. ती महाराष्ट्राची लेक होती. एवढे सारे पुरावे असताना देखील कारवाई होत नाही, हे तर नामर्द सरकार आहे, अशा शब्दात वाघ यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, आज 21 दिवस उलटूनही संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. मला विश्वास आहे की, आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी असते तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्ल असते. मुख्यमंत्री साहेब खरच खुर्ची एवढी वाईट आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुख्यमंत्री ठाकरे दबाव स्वीकरणारे नाहीत असा विश्वास आहे. पुन्हा हात जोडून विनंती करते की, या बलात्काऱ्याला हाकलून द्या त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. पूजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड या नावाच्या व्यक्तीचे 45 मिस्ड कॉल होते. हा संजय राठोड कोण आहे, याचे उत्तर द्यावे. तसेच 12 ऑडिओ क्लिपबाबात अजून काही स्पष्टता नाही. पुण्यांच्या आयुक्तांकडे एकाही प्रश्नाचे उत्तर नाही. सरकार, पोलिस प्रशासन बलात्काऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून काढून एखाद्या सक्षम आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवावा, अशी मागणी वाघ यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे.