चंद्रकांत पाटील यांच्या संदर्भातील ‘ त्या’ विधानाचा भाजपकडून निषेध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अमृता फडणवीस (amruta-fadnavis) यांच्या भाऊबीजेच्या दिवशी रिलीज झालेल्या एका गाण्यावर मराठी निर्माते व दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. याची सोशल मिडियावर प्रतिक्रिया उमटली. त्यावर अनेकांनी नापसंती व्यक्त केली व महेश टिळेकर -(mahesh-tilekar) यांच्यावर काहींनी टीका तर काहींनी समर्थनाच्या पोस्ट केल्या आहेत.

त्यानंतर टिळेकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant-patil) यांच्यासोबतचा एका कार्यक्रमातील फोटो फेसबुकवर पोष्ट करून अनावश्यक बादरायण संबध जोडले. त्यात त्यांनी खवळलेल्यांना भाजप भक्त व समर्थक संबोधले आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासोबतचा एका कार्यक्रमातील फोटो पोस्ट करुन स्टेजवर भक्तांचे लाडके नेते चंद्रकांत पाटील माझ्या बरोबर आहेत. म्हणजे मी जे काही त्या गायिकेच्या आवाजावर टीका करण्याची हिम्मत केली त्यामागे चंद्रकांत पाटील यांचा हात आणि पाठिंबा आहे असाही अर्थ आता हे भक्त काढतील का हे फोटो पाहून ?” असा सवाल टिळेकर यांनी केला आहे.

या वादात भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे फोटो वापरून त्यांना ओढण्याचा टिळेकरांचा प्रयत्न निषेधार्ह असून त्यांनी याबाबत माफी मागावी अशी मागणी भाजपाने केली आहे. टिळेकर यांनी निरर्थक व संदर्भहीन वक्तव्ये टाळावीत अन्यथा त्यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा भाजपचे पुणे शहर मुख्य प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी दिला आहे.