नंदुरबार लोकसभा : गड राखण्याचे भाजपला आव्हान ; काँग्रेस लढतीस सज्ज 

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाईन  – २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा सर्वाधिक फायदा झालेल्या खासदारांच्या यादीत हिना गावित हे एक नाव वरच्या क्रमांकाचे आहे. नवखा चेहरा असून हि त्यांनी नंदुरबारचे नऊ वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व केलेल्या काँग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव गावित यांचा पराभव केला. या पराभवा बरोबर त्यांनी इतिहास देखील रचला. परंतु आता काँग्रेसने गेल्या वेळेच्या पराभवाचा बदला घेण्याची रणनीती आखली आहे. येथील आदिवासी जनतेसाठी प्रियंका गांधी यांनी सभा घेऊन राज्यातील प्रचाराचा शुभारंभ करण्याचे ठरवले आहे.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील मतदार हे आदिवासी बहुल असल्याने तेथे गरीब निरक्षर लोकांच्या मनात घराणेशाही रुजवण्यास पहिल्या पिढीच्या नेत्यानां यश आले आहे. त्यामुळेच माणिकराव गावित नऊ वेळा लोकसभेत जाऊ शकले. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होऊन हि २००९ च्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला ६.३१ टक्के मते जास्त मिळाली आहेत. अर्थात आदिवासी मतदार काँग्रेस पासून दूर गेला नाही. याच निकालांच्या आकड्यांना डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस कामाला लागली आहे. तर आपला गड कायम ठेवण्यासाठी भाजपला शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात डॉ. हिना गावित यांच्या शिवाय दुसरा तगडा उमेदवार नाही. नंदुरबार हा मतदारसंघ अनुसूचित जमाती साठी राखीव असल्याने इतर मुसद्दी नेत्यांना त्या मतदारसंघात उमेदवारी करता येणार नाही. म्हणून भाजप हिना गावित यांच्या गळ्यातच उमेदवारीची माळ टाकण्याच्या तयारीत आहे. तर डॉ. विजयकुमार गावित यांनी काँग्रेसमध्ये येऊन लोकसभा निवडणूक लढवावी अशा देखील राजकीय खेळ्या खेळण्याचा प्रकार काँग्रेसने सुरु केला आहे. डॉ. विजयकुमार गावितांनी उमेदवारी करण्यास आपण इच्छुक नाही असे सांगून काँग्रेसच्या मनसुब्यावर पाणी सोडले आहे.

हिना गावित भाजपच्या उमेदवार पक्क्या मानल्या जात असल्याचे चित्र सध्या नंदुरबार मध्ये दिसत आहे. तर माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित, धडगावचे काँग्रेसचे आमदार ॲड. के. सी. पाडवी, माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांचे पुत्र शिरीषकुमार नाईक आदी नेत्यांची काँग्रेसच्या उमेदवारीसाठी भाऊ गर्दी झाली आहे. या गर्दीतून गुप्तपणे बाहेर पडून माजी मंत्री पद्माकर वळवींनी विधानसभाच नेटाने लढण्याची तयारी सुरु केली आहे. एकंदर काँग्रेस मध्ये स्पर्धा जरी अधिक असली तरी भाजपला जोरदार टक्कर देण्यासाठी काँग्रेस सज्ज झाली आहे.

२०१४ च्या नंदुरबार लोकसभा निकालाचे चित्र 
    डॉ. हीना गावित-भाजप- ५,७९,४८७, [विजयी]
    माणिकराव गावित -काँग्रेस- ४,७२,५८१
    अमित वसावे -बसपा- १२,१३३