‘या’ प्रकरणात भाजप नगरसेविकेस अंतरिम अटकपुर्व जामीन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- ससूनमधील महिला डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या नगरसेविका आरती कोंढरे यांना अंतरिम अटकपुर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. सत्र न्यायाधीश एन. एम. जमादार यांनी ससून रुग्णालयात न जाण्याच्या अटीवर जामीन मंजूर करत १५ हजारांच्या जात मुचलक्यावर त्यांची सुटका केली.

डॉ. स्नेहल खंडागळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.स्नेहल खंडागळे या ससून मध्ये रेसीडेन्ट डॉक्टर आहेत. त्या रात्री साडेबाराच्या सुमारास इमर्जन्सी वार्ड मध्ये पेशन्ट तपासत असताना आरती कोंढरे या तेथे आल्या आणि बेडवर झोपलेल्या पेशन्टकडे हात करून म्हणाल्या की, या पेशन्टकडे कोण पाहतंय. तसेच मोठमोठ्याने आरडाओरडा करत मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. हा पेशन्ट खुप सीरीअस आहे. याच्याकडे लक्ष द्या अषं त्या म्हणाल्या. त्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार झाले आहेत. डोक्याला टाके टाकले आहेत. सीटी स्कॅन साठी न्यायचे आहे. असं डॉक्टरने सांगितले. तेव्हा आरडाओरडा करून त्यांनी महिला डॉक्टरला तिचे नाव विचारून तिची तक्रार करण्याची धमकी दिली.

त्यानंतर डॉक्टर खंडागळे एक सीरीयस पेशन्ट पाहण्यात व्यस्त असताना कोंढरे यांनी व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. डॉक्टरने त्यांना व्हिडीओ किंवा फोटो न काढण्याची विनंती केली. तसेच हात पुढे करून मोबाईलसमोर धरला. तेव्हा कोंढरे यांनी त्यांच्या गालावर चापट मारली. त्यानंतर शिवीगाळ करत बघून घेण्याची धमकी दिली.अशी फिर्याद देण्यात आली आहे.

याप्रकरणी कोंढरे यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण करणे आणि डॉक्‍टर प्रोटेक्‍शन ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढरे यांनी ऍड. हर्षद निंबाळकर यांच्यामार्फत न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. दरम्यान न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत कोंढरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. ऍड. ऋषी घोरपडे, ऍड. शिवम निंबाळकर, ऍड. प्रणव पोकळे यांनी कामकाज पाहिले.