बीडमध्ये भाजप नगरसेवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई मधील भाजपाचे नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड यांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा खून झाला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जोगदंड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जोगदंड यांची हत्या कोणत्या राजकीय वैमनस्यातून झाली आहे का ? की यामागे आणखी कोणते कारण आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आंबेजोगाई येथील भाजपचे नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड यांच्यावर शहरातील रविवार पेठेतील पाण्याच्या टाकीजवळ अज्ञातांनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची हत्या केली. हल्ला केल्यानंतर आरोपी तिथून फरार झाले. या हल्ल्यानंतर त्यांना लगेचच स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी वेगवान हालचाली करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, जोगदंड यांची हत्या परळी वेस इथं झालेल्या भांडणातून झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, या हत्येनंतर आंबेजोगाई परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र या गंभीर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. शहरात नगरसेवकाचा खून होतं असेल तर कायद्याचे भय उरले आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.