भाजपचे नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांची प्रदेश ‘निमंत्रित सदस्य’ म्हणून निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. यानंतर भाजपच्या प्रदेश कार्यरणीच्या सदस्यांमध्ये पुण्यातील नगरसेवक राजेंद्र यशवंत शिळीमकर यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिळीमकर यांची निवड केली असून त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे.

शिळीमकर यांना देण्यात आलेल्या पत्रामध्ये नजीकच्या काळात पक्षाचे काम देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोपवलेल्या या जबाबदारीवर राजेंद्र शिळीमकर यांनी आभार मानले आहेत. दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने निभावून, पक्ष वाढीसाठी नेहमीच प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया राजेंद्र शिळीमकर यांनी दिली आहे.