तब्बल 1 कोटींची खंडणी मागणार्‍या भाजप नगरसेविकेच्या पतीला अटक

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाईन – व्यापाऱ्याकडे १ कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी कुख्यात गुंड दीपक सोंडे याला हिललाईन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यापूर्वी दीपक सोंडेवर अनेक पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे दीपक सोंडे हा भाजप नगरसेविकेचा पती असून, तो दोन महिन्यांपासून फरार होता. दीपक सोंडेने उल्हासनगर मधील व्यापारी नरेश रोहरा यांच्याकडे ४ जानेवारी रोजी खंडणी रूपात १ कोटी रुपयांची मागणी केली होती आणि खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती.

दीपक सोंडेवर खुनाचे, अपहरणाचे, खंडणीचे आणि खुनाचा प्रयत्न करण्याचे असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस आपल्या अनेक पथकांद्वारे दोन महिन्यांपासून त्याचा शोध घेत होते. बुधवारी हिललाईन पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दीपक सोंडेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.