भाजपा म्हणतंय’तुझी चोच केवढी, तुझा पोपट केवढा ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्यंगचित्र शेअर करण्यात आले आहे. हे व्यंगचित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आहे. या व्यंगचित्रात पिंजऱ्यातला एक पोपट दाखवण्यात आला आहे आणि या पोपटाला राज ठाकरेंचा चेहरा दाखवला आहे. जणू पिंजऱ्यातले पोपट राज ठाकरे आहेत आणि त्यांना शरद पवार पेरूची फोड देत आहेत असं व्यंगचित्रात दाखवण्यात आलं आहे. भाजपाने हे व्यंगिचत्र पोस्ट करत शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘तुझी चोच केवढी तुझा पोपट केवढा ?’ या व्यंगचित्रात पोपटावरची एक कविताही लिहण्यात आली आहे. त्यातही राज ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे.
दरम्यान, या व्यंगचित्रातील कवितेला पोपट असे शीर्षक देण्यात आले आहे. या पिंजऱ्यात एक पोपट दाखवण्यात आला आहे. या पोपटाला तोंड मात्र राज ठाकरे यांचे दाखवण्यात आले आहे. पिंजऱ्याच्या खाली शरद पवार उभे आहेत आणि ते पेरूची फोड पोपटाला देत आहेत असे दाखवण्यात आले आहे. या कवितेतील काही ओळी आहेत की,पोपटा-पोपटा

बोलतोस गोड
महाराष्ट्राला ठाव आहे तू झालास रोड

खा ना तू बारामतीची फोड

भाऊ भाऊ

बोलतोस गोड
घेऊन बारामतीची फोड

सत्तेचं दार उघडेना, मोह सोडवेना

अशा ओळी लिहत भाजपाने राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. दरम्यान पोपट ही मूळ कविता सरला देवधर यांची आहे. याच कवितेत बदल करून भाजापाने पोपट कवितेचं विडंबन केलं आहे. भाजपाने आणखी ट्विट करत सरला देवधर यांची मूळ कविता पोस्ट करत त्यांची माफीही मागितली आहे.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे काल मुंबईतील रंगशारदा सभागृहात बोलत होते. त्यावेळी बोलताना त्यांनी भाजपा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. हवा गेलेल्या फुग्याला दाबला की तो कसाही आकार घेतो. जर या दाबलेल्या फुग्याला जॅकेट घातलं तर तो फुगा कसा दिसेल ? असा हा जॅकेट घातलेला फुगा म्हणजेच देवेंद्र फडणवीस असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यांनी केलेल्या टीकेवरून आज भाजपाने व्यंगचित्र ट्विटरवर शेअर करत राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरेंच्या भाषणातला ‘पोपट’ पाकिस्तानचा तर नाही ना ? असा प्रश्न विचारात तावडे यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे. राज ठाकरे पाकिस्तानचे हिरो बनू पाहताहेत, अशा शब्दात तावडे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.