राष्ट्रीय ‘मुद्दे’ मांडल्याने भाजपचा पराभव, ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचा भाजपला ‘चिमटा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – झारखंड विधानसभेत भाजपला मोठा झटका बसल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने राज्याच्या निवडणूकीत राष्ट्रीय मुद्दे मांडल्याने भाजपला हार स्वीकारावी लागली असे म्हणत भाजपच्या हातातून राज्य निसटत चालल्याचा चिमटा पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपला काढला.

पृथ्वीराज चव्हाण यांनी झारखंड विधानसभेच्या निवडणूक निकाल समोर आल्यानंतर भाजपवर सडकून टीका केली, चव्हाण म्हणाले की प्रत्येक निवडणूकीत राष्ट्रीय मुद्दे मांडून भाजपची राज्यात हार होत आहे. भाजपने 370 कलम, नागरिकत्व मुद्दे विधानसभेच्या निवडणूकीत मांडले, त्यामुळे भाजपला राज्यात यश मिळालं नाही. भाजप अर्थव्यवस्था अडचणीत आहे हे स्वीकारत नाही.

यावेळी राज्यातील शेतकऱ्यांनी देण्यात आलेल्या कर्जमाफीवर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नांना प्रतिउत्तर दिले. चव्हाण म्हणाले की राज्यावर कर्जाचा किती डोंगर आहे हे पाहून निर्णय घ्यावा लागेल. कर्जमाफीचा हा पहिला निर्णय आहे. फडणवीसांनी दिलेल्या कर्जमाफीच्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कमेची ही कर्जमाफी आहे. केंद्र सरकार किती मदत करणार हे पाहणे देखील आवश्यक असेल. आमचे सरकार 80 तासांचे नाही, 5 वर्षांचे आहेत.

भाजपने घेतलेले काही चूकीचे निर्णय देखील रद्द करावे लागतील. भाजप सरकारने चूकीचे निर्णय घेतले आहेत, राज्यावर मोठे कर्ज लादून ठेवले आहे. बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प रद्द केले पाहिजे, ही प्राथमिकता नाही. हे मी मुख्यमंत्र्यांपुढे मांडणार आहे. स्थगिती विचार करण्यासाठी घेतली असेल तर त्यात गैर नाही असेही चव्हाण म्हणाले.

मंत्रिमंडळाच्या विस्तारावर देखील चव्हाण यांनी भाष्य केले. ते म्हणाले की राज्यातील मंत्रिमंडळात कोण असणार हे केंद्रातील नेते ठरवतील. पक्ष श्रेष्ठी घेतली तो निर्णय मला मान्य असेल. तिन्ही पक्षांची विचारसरणी वेगवेगळी आहे, मतभेद होऊ शकतात, परंतु आम्ही एक दिलाने एकत्र काम करु. राज्य जिंकली तरी देशात काँग्रेसला उभारी घ्यावी लागेल.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/