पश्चिम बंगालमधील हिंसाचार चिघळला, राष्ट्रपती राजवट लागू होणार ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पश्चिम बंगालमधील राजकीय संघर्षाने हिंसात्मक आणि उग्र स्वरूप धारण केले आहे. मागील चोवीस तासांत या संघर्षामुळे चार जण मृत्युमुखी पडले आहेत. यासंदर्भात तृणमूल कांग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये मात्र आरोप प्रत्यारोपांना उधाण आले असून त्यांनी एकमेकांवर गंभीर प्रकारचे आरोप केले आहेत. भाजपाने आरोप केला आहे कि भाजपच्या लोकसभेतील विजयानंतर होणाऱ्या अभिनंदन यात्रेमध्ये लोकांना सामील होण्यापासून रोखण्यासाठी तृणमूल काँग्रेस हिंसाचार पसरवत असून दहशत निर्माण करत आहे. तर याउलट तृणमूल काँग्रेस ने भाजप बाहेरील लोकांना आणून हिंसाचार पसरवून हेतुपूर्वक वातावरण खराब करत असल्याचा प्रत्यारोप केला आहे.

भाजपच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पार्टीचे एक उच्च्स्तरीय प्रतिनिधिमंडळ पश्चिम बंगालमधील घटनास्थळांचा दौरा करून तेथील हिंसेसंदर्भात अहवाल पार्टीला सादर करेल. भाजपाने आपल्या कार्यकर्त्यांना यासंदर्भात सावधानी बाळगण्याचा सल्ला दिला असून गृहमंत्री अमित शहा परिस्थितीवर बारकाईने लक्ष देऊन आहेत. शहा पश्चिम बंगालच्या राज्यपालांच्यादेखील सातत्याने संपर्कात आहेत.

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार ?
या हिंसाचारात जवळपास १०० कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचा दावा भाजपने केला आहे. भाजपाच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत बिकट झालेली असून राज्य सरकार हि परिस्थिती सांभाळण्यास पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे कळते. राज्यपालांनी या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून याचा अहवाल केंद्राला पाठवावा जेणेकरून केंद्र सरकार यासंबंधी योग्य आणि उत्तम निर्णय घेऊन उपाययोजना करू शकेल. दार्जिलिंगसहित राज्यातील अनेक ठिकाणांहून मोठ्या प्रमाणावर लोक भाजपमध्ये सामील होत असल्याने ममता बॅनर्जींच्या पायाखालची जमीन सरकली असून त्या हिंसेद्वारे लोकांना घाबरवून भाजपमध्ये जाण्यापासून थांबवत आहेत. असे देखील प्रदेश भाजपने म्हटले आहे.

दरम्यान पश्चिम बंगाल भाजपच्या काही वरिष्ठ आणि प्रमुख नेत्यांचे असेही म्हणणे आहे कि ‘भाजप बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न स्वतःहून कधीच करणार नाही कारण याचा फायदा घेऊन ममता बॅनर्जी लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करतील याची भाजपला पूर्ण जाणीव आहे. हिंसा कोण घडवून आणते आहे याची लोकांना पूर्ण कल्पना असून ममता बॅनर्जींची लोकप्रियता यामुळेच घटते आहे. याचे परिणाम तृणमूल काँग्रेस ला विधानसभा निवडणुकीतही भोगावे लागतील.’

याआधी कधी लागू झाली होती पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट ?
पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा २० फेब्रुवारी १९६८ साली राष्ट्रपती लागवत लागू झाली होती जी एक वर्ष आणि ५ दिवस चालली होती. यानंतर १९ मार्च, ३०जुलै १९७० मध्ये राष्ट्रपति राजवट लागू झाली होती. यानंतर देखील १९ जून १९७१ आणि ३० एप्रिल १९७७ या तारखांना राज्यात आणीबाणी लागू करण्यात आली होती. अशा पद्धतीने आत्तापर्यंत तब्ब्ल ५ वेळा पश्चिम बंगालमध्ये आणीबाणीद्वारे राष्ट्रपती राजवट लागू झाली होती.