उल्हासनगर : भाजपच्या उपजिल्हाध्यक्षावर जीवघेणा हल्ला, रुग्णालयात उपचार सुरु

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाइन – उल्हासनगर भाजपचे उपजिल्हाध्यक्ष जयकुमार शर्मा यांच्यावर उल्हासनगरमध्ये जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत शर्मा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उल्हासनगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प नंबर 3 भागातील इंदिरा गांधी मार्केट परिसरात शनिवारी मध्यरात्री घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जयकुमार शर्मा यांचे इंदिरा गांधी मार्केट परिसरात घर आहे. मात्र, ते या ठिकाणी राहत नाहीत. हे घर त्यांनी भाड्याने दिले आहे. मागील काही दिवसांपासून भाडेकरुंना काही जण त्रास देत आहेत. भाडेकरुंनी याची कल्पना शर्मा यांना दिली आहे. मात्र, कामामुळे त्यांचे याकडे दुर्लक्ष झाले. शनिवारी रात्री एकच्या सुमारास अज्ञातांनी घराचा दरवाजा वाजवून भाडकरुंना त्रास देण्याचा प्रकार सुरु केला होता.

भाडेकरुंनी या प्रकाराची माहिती जयकुमार शर्मा यांना दिली. शर्मा त्या ठिकाणी गेले असता घराच्या गल्लीत काही लोक अंधारात दबा धरून बसले होते. शर्मा यांनी कोण आहे, अशी विचारणा केली. मात्र तू कोण आहे असे प्रत्युत्तर या अज्ञात व्यक्तींनी शर्मा यांना दिले. त्यानंतर शर्मा यांनी मागच्या बाजून गेले असता अज्ञातांनी तुझी वाट बघत होतो असे म्हणत त्यांच्यावर हल्ला केला. शर्मा यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला.

यामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागल्याने डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. जखमी अवस्थेत शर्मा हे उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांच्या डोक्यातून रक्त मोठ्या प्रमाणात येत असल्याने पोलिसांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी कुणाल आणि हरेश या दोघांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, भाडेकरुंना त्रास देऊन शर्मा यांच्यावर हल्ला करण्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही.