खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी अखेर पक्षाचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहिर केले. शुक्रवारी दुपारी दोन वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती जयंत पाटील (jayant patil) यांनी पत्रकार परिषदेत दिली. एकनाथ खडसे यांनी सकाळी पक्षाचा राजीनामा दिला अशी माहिती मिळाली असून त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत घेण्यात कोणतीही अडचण नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान खडसेंच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयावर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खडसेंच्या राजीनाम्याविषयी अधिकृत माहिती आलेली नाही. राजीनामा मिळाला तर प्रदेशाध्यक्ष योग्य निर्णय घेतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सागिंतलं. खडसेंना थांबवण्याचा प्रयत्न करणार का ? असे विचारले असता ते म्हणाले, आमच्या अध्यक्षांनी आधीच प्रयत्न केले आहेत ते याविषयी अधिक सांगू शकतील. देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीचा फटका बसलेल्या जिल्ह्यांचा दौरा करत असून परिस्थितीची पाहणी करत आहेत. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा होण्यापुर्वी अनेक नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या. खडसेंनी सकाळी जयंत पाटील यांचं ट्विट रिट्विट करत आपण राष्ट्रवादीत जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली होती. मात्र, खडसेंनी तासाभरातच माघार घेतत्याने खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता.