‘हा’ तर त्यांचा कौटुंबिक विषय : देवेंद्र फडणवीस

पोलिसनामा ऑनलाईन – माझा नातू पार्थ पवार अपरिपक्व असून, त्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्याला फटकारले होते. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना हा त्यांचा कौटुंबिक विषय असल्याचे म्हटले आहे.

आजोबा आणि नातूमधील वाद, संवाद, विवाद जे काही असेल त्यात आम्ही काय बोलावे, हात्यांच्या घरचा प्रश्न आहे. आजोबांनी नातवाला किंमत द्यायची की नाही हे आजोबांनी ठरवायचे आहे किंवा नातवाने आजोबांना आवडेल असे वागायचे की नाही हे नातवाने ठरवायचे आहे. त्यासंदर्भात मी बोलणे योग्य ठरणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले आहे. पण एक नक्की आहे की, त्यांनी सीबीआय चौकशी करायला माझी हरकत नाही असं सांगितलं आहे. त्यांनी भूमिका स्पष्ट केली असल्याचे त्यांनी सांगितले. पार्थ पवार यांच्या भूमिकेमुळे गेले तीन-चार दिवस राष्ट्रवादीची पंचाईत झाली होती. चित्रपट अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी भाजपकडून करण्यात येत असताना महाविकास आघाडी सरकारकडून मुंबई पोलीस हा तपास योग्यपणे करीत असल्याची ग्वाही दिली जात आहे. त्याच वेळी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांतसिंहच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी करणारे पत्र दिले होते. या पत्राची प्रत आणि गृहमंत्र्यांना निवेदन देतानाचे छायाचित्र त्यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केले होते.