‘तन्मय’ माझा दूरचा नातेवाईक, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने लस घेतल्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. नियमांचे उल्लंघन करून तन्मयचं लसीकरण झाल्याच्या मुद्यावरुन सत्ताधारी महाविकास आघडीच्या नेत्यांनी भाजपला व देवेंद्र फडणवीस यांना घेरलं आहे. सध्या देशात 45 वर्षाच्या पुढील लोकांना लसीकरणासाठी परवानगी असतानाही पात्र नसलेल्या तन्मय फडणवीसला लस कशी काय देण्यात आली असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

तन्मनय फडणवीसच्या फोटोवरुन झालेल्या वादावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, कोरोना लसीकरणासाठी असणाऱ्या नियमांचं पालन केलं पाहिजे याबाबत दुमत नसून कोणालाही चुकीच्या पद्धतीने ते करण्याची परवानगी देता कामा नये. तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर ते अगदी अयोग्य आहे, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले आहे.

रुग्णालयाकडून स्पष्टीकरण

तन्मय फडणवीस याने नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये लसीचा दुसरा डोस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. वाद निर्माण झाल्यानंतर हा फोटो डिलीट करण्यात आला आहे. दरम्यान नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक शैलेश जोगळेकर यांनी सांगितले की, तन्मय फडणवीस याने आमच्याकडे लसीचा दुसरा डोस घेतला. मुंबईमधील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्याने पहिला डोस घेतला होता. त्याला कोणत्या निकषावर पहिला डोस दिला याची कल्पना नाही. त्याने आम्हाला प्रमाणपत्र दाखवल्यानंतर आम्ही आमच्या सेंटरमध्ये दुसरा डोस दिला.