मला प्रियांका गांधींना विचारायचं आहे की त्यांनी…’ फडणवीसांचा थेट गांधी कुटुंबावर घणाघात !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. देशातील अनेक राज्यांत कोरोनाची परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडून कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्याचे आव्हान केंद्र सरकारसमोर उभं आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या आणि महासचिव प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. प्रियांका गांधी यांच्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रियांका गांधी, राहुल गांधी आणि सोनिया गांधी अशा प्रकारे टीका करुन, पत्रकार परिषदा घेऊन देशात वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सडेतोड उत्तर फडणवीस यांनी दिले.

कधी महाराष्ट्र सरकारसोबत चर्चा केली का ?

प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकाला प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी गांधी कुटुंबावर निशाणा साधला. काँग्रेस आणि गांधी कुटुंबीयांना देशात नकारात्मक वातावरण निर्माण करायचे आहे, असे दिसत आहे. मला प्रियंका गांधी यांना एक विचारायचे आहे की, त्यानी या त्यांच्या मुद्यावर महाराष्ट्र सरकारसोबत चर्चा केली आहे का ? या ठिकाणी काय परिस्थिती आहे ? देशात आढळून येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी महाराष्ट्रातील 30 ते 40 टक्के रुग्ण आहेत. तसेच देशात जेवढे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी 35 ते 37 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले.

काय म्हणाल्या प्रियांका गांधी ?

आज देशात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, व्हेंटिलेटरची कमतरता असल्याचे अहवाल येत आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्याने आपल्याकडे बराच कालावधी होता. आपला देश ऑक्सिजन निर्मिती करणारा सर्वात मोठा देश असताना आता ऑक्सिजनची कमतरता का जाणवत आहे. कारण ऑक्सिजनची वाहतूक करण्याची सुविधा तयार करण्यात आलेली नाही. तुमच्याकडे 8-9 महिने होते. आज देशात केवळ 2 हजार ट्रक ऑक्सिजनची वाहतूक होऊ शकते. देशात ऑक्सिजन आहे, मात्र त्या ठिकाणी पोहचण्याची आवश्यकता आहे, परंतु वेळेत पोहचता येत नाही, अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता.