मुख्यमंत्री ठाकरेंच्या आव्हानाला देवेंद्र फडणवीसांनी दिलं जशास तसं उत्तर, म्हणाले – ‘चालवून तर दाखवा’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामानाला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे तीन चाकी सरकार असले तरी त्याचे स्टेअरिंग माझ्याकडे आहे, असे म्हणत भाजपला टोला लगावला होता. तसेच सरकार पाडून दाखवाच, असा थेट इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले होते. त्यांच्या या आव्हानाला भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.
आज भाजपची कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. रिक्षांचे स्टेअरिंग उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे पण त्यात बसलेले सवारी सांगतात कोणत्या दिशेला ही रिक्षा चालली आहे ते कळत नाही. तुम्ही फक्त सरकार चालवून तर दाखवा, असा सणसणीत टोला फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये स्वत: मारायच आणि स्वत:च रडायचं असा प्रकार सुरु आहे. आम्हाला सरकार पाडण्यात कोणताही रस नाही. हे सरकार अंतर्विरोधाने पडेल, असे पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट केलं. जनतेनं निवडून दिलेलं सरकार आहे अशा तोऱ्यात काही नेते बोलत आहेत. पण हे बईमानानं तयार झालेलं सरकार आहे. आम्ही ते सगळं विसरलो आहोत. पण जेव्हा जेव्हा जनतेवर अन्याय होईल तेव्हा तेव्हा भाजप संघर्ष करेल, असा इशाराही फडणवीस यांनी सरकारला दिला.
कोरोनाच्या संकटात आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण लोकांवर अन्याय होत असेल तर आम्ही ते समोर आणू, असे देखील फडणवीस म्हणाले. संजय राऊत यांची खिल्ली उडवताना फडणवीस म्हणाले, सामानाच्या मुलाखतीत विद्वान संपादक साखरेचा प्रश्न घेऊन हे केंद्रीय गृहमंत्र्यांकडे का गेले ? मुख्यमंत्र्यांनाही माहिती नाही आणि ते आदेश बांदेकर गृहमंत्री वगैरे म्हणत होते, असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली.