मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरचा पांडुरंग देखील कोंडून ठेवला, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा आरोप

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी मागील सात महिन्यांपासून राज्यातील सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली आहे. तथापि, सरकारने अनलॉक जाहीर केल्यावर दारुची, बिअरची दुकाने सुरु केली. मात्र, मंदिरे अजूनही बंद ठेवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरचा पांडुरंग सुद्धा कोंडून ठेवला आहे, असा आरोप करत भाजपच्यावतीने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आला.

राज्यातील विविध मंदिरांसमोर भाजपतर्फे मंदिर सुरु करावीत या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. पंढरपुरात श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करावे, यासाठी संत नामदेव पायरीजवळ भाजपने आंदोलन केले. त्यावेळी बोलताना भाजपचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देखमुख यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

देशमुख यांनी म्हटलं की, परमात्मा पांडुरंगाचे मंदिर गेल्या सात महिन्यांपासून बंद आहे. केंद्र आणि राज्य सरकारने अनलॉक सुरु केल्यावर अनेक आस्थापने, दारुची आणि बिअरची दुकाने सुरु केली. तसेच सार्वजनिक वाहतूक सुरळीत झाली आहे. पण मंदिरे का बंद ठेवण्यात आली आहेत, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरच्या पांडुरंगासोबत राज्यातील देव कोंडून ठेवले आहेत. सरकारच्या ताब्यातून देवांना मुक्त करण्यासाठी आंदोलन सुरु करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावेळी कार्यकर्त्यांनी संत नामदेव पायरीजवळ भजन म्हणत सरकार विरुद्ध घोषणाबाजी केली. तसेच मंदिरे सुरु करण्याची मागणी केली.

देशमुख आणि पोलिसांत झाली बाचाबाची

जिल्हा भाजपकडून श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुरु करण्यासाठी संत नामदेव पायरी जवळ मंगळवारी सकाळी ११ वाजता आंदोलन जाहीर करण्यात आले होते. त्याप्रमाणे भाजप कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच संत नामदेव पायरीजवळ गर्दी करण्यास सुरु केली होती. मात्र, पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव संत नामदेव पायरीजवळ आंदोलन करण्यास मनाई केली. यामुळे संताप अनावर झाल्याने जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी पोलिसांच्या या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत आंदोलन येथेच करणार, आम्हाला अटक करायची तर करा, आम्ही जेलमध्ये जाण्यास तयार आहोत, असे म्हणत आक्रमक भूमिका घेतली.