यंदाही मस्के यांच्या हातून निसटली गावची ग्रामपंचायत, राष्ट्रवादीने पुन्हा फडकविला झेंडा

पोलीसनामा ऑनलाईन : बीडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना यंदाही आपल्या गावची ग्रामपंचायत जिंकता आली नाही. पालवण ग्रामपंचायतीवर यावर्षीही राष्ट्रवादीने आपला झेंडा फडकविला आहे. एवढेच नव्हे यंदा आपल्या  ग्रामपंचायतीचे मैदान मारायचे असा चंग बांधलेल्या मस्केंनी निवडणुकीत भाजपचा कट्टर विरोधक शिवसंग्राम, शिवसेना यांनाही साथीला घेतले होते, मात्र राष्ट्रवादीचे या सर्वाना मात देत पुन्हा एकदा सरपंच – उपसरपंचपदी आपली वर्णी लावली. आमदार संदीप क्षीरसागर समर्थक ताई नजान सरपंच झाल्या तर अश्विनी मस्के उपसरपंच झाल्या आहेत.

राजेंद्र मस्के  सलग दोन वेळा भाजप जिल्ह्याध्यक्षपदी आहेत. मराठा महासंघ, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसंग्राम आणि आता भाजप असा त्यांचा राजकीय  प्रवास. त्यांच्याकडे दोन वेळा जिल्हा परिषद सदस्यपद देखील होते.  त्यांच्या पत्नी जयश्री मस्के यांच्याकडे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद होते. शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्षपद आणि नंतर युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्षपदही  त्यांच्याच हाती होते.  दरम्यान, त्यांनी शिवसंग्रामची साथ सोडल्यानंतर  जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता गेली. परंतु, पंकजा मुंडे यांनी मस्के यांना जिल्हा परिषद सोपविली.

मात्र, एवढा दबदबा असूनही मस्के यांना बीड शहराला खेटून असलेल्या त्यांच्या गावची ग्रामपंचायत काही मिळविला आली नाही. त्यात  पालवण आणि बीड एकत्रच झाले आहे, असे असूनही त्यांचे गावाकडे थोडे  दुर्लक्षच  झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.