महापालिकेच्या चारही विषयसमित्यांवर भाजपचे वर्चस्व

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महापालिकेच्या चारही विषय समित्यांच्या निवडणुकीत भाजपचाच प्रभाव कायम राहिला असून भाजपची एकहाती सत्ता असल्याने अध्यक्षपदी भाजपच्याच सदस्यांचे वर्चस्व कायम आहे.

चार विषय समित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी आज पालिकेत निवडणूक झाली. शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी अमोल बालवडकर, विधी समिती अध्यक्षपदी योगेश समेळ, महिला आणि बालकल्याण समिती अध्यक्षपदी ज्योत्स्ना एकबोटे, क्रीडा समिती अध्यक्षपदी विजय शेवाळे या भाजपच्या नगरसेवकांची निवड झाली.

महापालिकेत भाजपचे निर्विवाद बहुमत आहे. त्यामुळे सर्व समित्या भाजपला मिळणार हे निश्चितच होते. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली. शिवसेनेनी भाजपच्या प्रचाराचे काम केले आहे याकारणाने शहर सुधारणा अथवा महिला बालकल्याण यापैकी एका समितीचे अध्यक्षपद शिवसेनेला मिळावे अशी शिवसेनेची मागणी होती. परंतु चारही समित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांसाठी भाजपने अर्ज भरले आणि शिवसेनेची मागणी मागे पडली, भाजपने वर्चस्व कायम ठेवले. येत्या सोमवारी पंधरा प्रभाग समित्यांचे अध्यक्ष निवडले जाणार असून पैकी अकरा समित्यांवर संख्याबळानुसार भाजपचेच अध्यक्ष निवडून येतील. तीन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्षपद मिळवू शकेल. एका ठिकाणी समसमान संख्याबळ असल्याने चिठ्ठी टाकून अध्यक्ष निवडला जाईल.

भाजप, शिवसेना युतीच्या वरिष्ठ नेत्यांनी आपले राज्यातील राजकारण साधण्यासाठी पुणे महापालिकेत शिवसेनेच्या तोंडाला पानेच पुसली अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी दिली.