‘गोपीनाथ मुंडेंनी कधी पाठीत खंजीर खुपसला नाही’, खडसेंचा भाजपाला घरचा आहेर

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे त्यांना तिकीट न दिल्यामुळे नाराज होते. त्यामुळे ते पक्ष बदलतात का असे वृत्त सगळीकडे फिरते आहे. त्याबाबत तशा हालचाली देखील पहावयास मिळाल्या. आज गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपाला घरचा आहेर दिला आह. एकनाथ खडसे म्हणाले की, गोपीनाथ मुंडे आज असते तर ही वेळ आली नसती, असे भाजपाच्या एकंदरीत राजकीय परिस्थितीला अनुसरून ते म्हणाले. तसेच एकनाथ खडसे म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या नेत्यांमुळेच भाजपा पक्षाची शेटजी, भटजींचा पक्ष म्हणून असणारी ओळख बदलली. वंचितांना न्याय देऊन भाजपा पक्ष हा बहुजन समाजाचा देखील पक्ष आहे अशी ओळख त्यांच्यामुळे निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एकनाथ खडसे गोपीनाथ गडावर उपस्थित आहेत. त्यामुळे ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच ते म्हणाले, गोपीनाथ मुंडेंबरोबर प्रमोद महाजन, अण्णा डांगे, नितीन गडकरी अशा अनेक नेत्यांनी पक्षासाठी काम करून सर्वसामान्य जनमानसात पक्षाला स्थान दिले आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्रात भाजपा पक्षाची प्रतिमा बदलली आहे. यामुळेच पक्षाची ओळख बहुजन समाजाचा पक्ष अशी बदलण्यात यश आलं. संघर्षाच्या कार्यकाळात गोपीनाथ मुंडे यांनी नेतृत्त्व केलं. त्यांचा सहकारी होतो याचा मला अभिमान आहे. पण चांगला कालखंड आला तेव्हा ते निघून गेले, अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. तसेच “माझ्या जीवनात जेव्हा अडचण आली तेव्हा ते पाठीशी उभे राहिले असं सांगताना आज जी परिस्थिती आहे ती गोपीनाथ मुंडे असते तर आली नसती,” अशी भावना यावेळी खडसे यांनी व्यक्त केली.

तसेच एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, “गोपीनाथ मुंडे यांनी कधी पाठीत खंजीर खुपसला नाही. मर्दासारखे समोरासमोर लढले. कधी विश्वासघात केला नाही.” तसेच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हटले की माझी निवडून येण्याची खात्री असतानाही पक्षाने मला तिकीट नाकारलं आणि माझी मुलगी इच्छूक नसताना तिला जबरदस्ती तिकीट दिले. आणि ही जागा धोक्यात येऊ शकते असे माहिती असूनही तिला तिकीट देण्यात आले त्यामुळे हे सगळं घडवण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

खडसेंनी मुंडे साहेबांच्या अनेक आठवणी सांगत सध्याच्या राजकारणात मदत करण्याची भावना नसल्याचे स्पष्ट सांगितले आणि त्यांची नाराजी उघडपणे त्यांनी मांडली. तसेच मागील महिन्यात घडलेल्या राजकीय नाट्याबाबत ते बोलले,“एका महिन्यात आम्ही खूप काही पाहिलं. आम्ही ८० तासांचा मुख्यमंत्री पाहिला. भाजपाच्या विरोधी पक्षांचा आज मुख्यमंत्री झाला. काळ किती चमत्कार करतो हे आम्ही एका महिन्यात पाहिलं,” अशी खोचक टीका त्यांनी भाजपावर केली. एकंदरीत सर्वांना सोबत घेऊन पक्षाने कामगिरी केली असती तर आज परिस्थिती वेगळी पहायला मिळाली असती असे एकनाथ खडसेंनी स्पष्ट केले.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/