अनेक आमदारांच्या भाजपा प्रवेशाची तारीख निश्चीत ! ‘या’ दिवशी करणार भाजपात प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपामध्ये येणाऱ्याची दिवसेंदिवस संख्या वाढत असून साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक हे भाजपामध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झाले आहे. येत्या बुधवारी (दि.३१) जुलै रोजी ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा भाजपा प्रवेश सोहळा मुंबई येथील वानखेडे स्टेडियममधील गरवारे हॉलमध्ये होणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपच्या संपर्कात आहेत. शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी अर्ज केलेला नाही. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. शिवेंद्रराजेंचं घराणं स्थापनेपासून राष्ट्रवादीसोबत आहे. मागील सलग तीन टर्म शिवेंद्रराजे साताऱ्यातून राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो.

माजी मंत्री सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे सुपुत्र आणि अकोले येथील आमदार वैभव पिचड हे देखील शुक्रवारी होणाऱ्या कार्य़क्रमात भाजपात प्रवेश करणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. वैभव यांनी नुकतीच वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गृहनिर्माण मंत्री व नुकतेच भाजपमध्ये आलेले राधाकृष्ण विखे-पाटील हेही यावेळी उपस्थित होते.

नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते, माजी मंत्री गणेश नाईक यांचे पुत्र आणि आमदार संदीप नाईक हे देखील भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. भाजपमध्ये प्रवेश करावा असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांचे मत बनले असून, नगरसेवकांचा तसा दबाव गणेश नाईक यांच्यावर वाढत असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

आरोग्यविषयक वृत्त