भाजपच्या नेत्यानं घेतली सुप्रिया सुळेंची भेट, राजकीय चर्चेला उधाण

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   भाजपचे नेते आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. सुप्रिया सुळे यांनी या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सुप्रिया सुळे आणि धनंजय महाडिक भेटीने कोल्हापूरात राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र निवडणुकीनंतर राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर भाजपला विरोधात बसावे लागले तर तिन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी तयार करुन राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये गेलेले अनेक नेते पुन्हा राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक असल्याने ते राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत असल्याचे पहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढलेले धनंजय महाडिक हे विधानसभेपूर्वी भाजपमध्ये दाखल झाले. साखर कारखान्याच्या मुद्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. त्यानंतर आताही त्याच मुद्यावरून महाडिक यांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. ही भेट राजकीय नसून खासगी कामासाठी होती, असे स्पष्टीकरण धनंजय महाडिक यांनी दिलं आहे.

दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दिल्ली दौरा केला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यावेळी फडणवीस यांच्यासोबत धनंजय महाडिक हे देखील उपस्थित होते. राज्यातील साखर उद्योगासाठीच फडणवीस यांनी दिल्ली दौरा केल्याचे सांगण्यात आलं होतं.