भाजप आमदारावर बाईकस्वारांचा गोळीबार

गाझियाबाद : वृत्तसंस्था
भारतीय जनता पार्टीचे आमदार नंदकिशोर गुर्जर हे जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले़ नंदकिशोर गुर्जर हे गाझियाबादमधील लोनी विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. रविवारी रात्री मोटारसायकलस्वारांनी गुर्जर यांच्या गाडीवर बेछूट गोळीबार केला. यावेळी गुर्जर यांच्या सुरक्षारक्षकांनी गोळीबाराला प्रत्युत्तर देत त्यांना पोलीस स्टेशनपर्यंत सुरक्षित पोहचवत त्यांचे प्राण वाचवले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर रविवारी रात्री मवाना येथे झालेल्या आरएसएसच्या बैठकीत सहभागी होऊन परतत होते. त्याचवेळी मोटारसायकलवरुन आलेल्यांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला.

दोन मोटारसायकलवर चार हल्लेखोर होते़ त्यांनी अगदी समोर येऊन गोळीबार करण्यास सुरुवात केली़  गोळीबार होत असल्याचे लक्षात येताच गुर्जर खाली वाकल्याने हल्लेखोरांनी झालेल्या गोळ्या त्यांना लागल्या नाहीत़ त्यांच्याबरोबरच्या सुरक्षारक्षकांनीही प्रतिउत्तरे देण्यास सुरुवात करताच हल्लेखोर पळून गेले़