भाजपाची २५० उमेदवारांची यादी तयार ; ‘या’ ज्येष्ठ नेत्यांचा पत्ता कट ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. भाजपानं जवळपास २५०  उमेदवारांची यादी तयार केली आहे. या यादीमध्ये दिग्गज उमेदवारांचा पत्ता कट करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे  लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना तिकीट मिळणार का, याची कुजबुज सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अद्याप सत्ताधारी भाजपानं उमेदवारांची घोषणा केलेली नाही. पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या नेत्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं काही महिन्यांपूर्वी घेतला आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार स्वत: माघार घेणार की तरुणांना संधी देण्यासाठी पक्षाकडून त्यांची तिकीटं कापली जाणार, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी स्वत:हून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानं आता मार्गदर्शक मंडळातील नेत्यांचं काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

भाजपची यादी आज होणार जाहीर –
कोलाष्टक काळ असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला प्रचार थांबविला होता. हा कोलाष्टक काळ संपल्याने आता भाजपच्या देशभरातील किमान २५० उमेदवारांची यादी एकाचवेळी जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या जागांवरील उमेदवारांची घोषणा प्रामुख्याने होणार आहे. छत्तीसगडमधील सर्व खासदारांना नारळ देण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.
You might also like