‘आम्ही चंद्रकांत पाटलांना कोल्हापूरमधून निवडून आणू’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपण कोल्हापुरला जाणार आहे, असे म्हटलं होतं. यानतंर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी खुलासा हि केला होता. मात्र, आता भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी तोच धागा पकडत आम्ही चंद्रकांत पाटलांना कोल्हापूरमधून निवडून आणू, असं म्हटलंय. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

पाटील म्हणालेत की, मी पुढील निवडणूक कोल्हापूरमधून लढविणार. त्यामुळे मी एकच सांगतो की, त्यांनी तेथून निवडणूक लढवल्यास त्यांच्या निवडणुकीचा प्रचारप्रमुख मी असेन आणि त्यांना आम्ही निवडून आणू. एवढंच लक्षात ठेवा, अशी भूमिका संजय काकडे यांनी मांडलीय.

माजी खासदार संजय काकडे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही ठिकाणच्या नामांतराबाबत बोलताना सांगितलं, महाराष्ट्र राज्यात करोनामुळे मागील 10 महिन्यांपासून अनेक तरुणांच्या हातचे रोजगार गेलेत. त्यामुळे राज्य सरकारने तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल याकडे विशेष लक्ष द्यावे. पण, हे सरकार औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही ठिकाणांचे नामांतर करण्याकडे लक्ष देतंय. या मोठ्या नेत्यांनी नामांतर विषय बाजूला ठेवून प्रथम तरुणांना रोजगार द्यावा. नामांतर केल्याने काहीही फरक पडणार नाही. त्यासाठी एखादी समिती नेमावी आणि ती समिती त्यावर काम करेल. महाविकास आघाडीच्या कामकाजावर बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकार स्थिर दिसतंय. मी काही भविष्य सांगू शकत नाही.

आमचे कोणतेही नगरसेवक पक्षांतर करणार नाहीत

प्रत्येक पक्षात काही प्रमाणात नाराजी असते. त्यात आज भाजपाचे 19 नगरसेवक महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा सुरू झालीय. आमचे भाजपाचे 98 नगरसेवक इतर कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाहीत. काहीजण अफवा पसरवत आहेत. निवडणुका जवळ आल्या की, अशा चर्चाना सुरुवात होते. असंही संजय काकडे यांनी म्हटलंय.