अनेक दिवसांनी मिळाली भाजपाला ‘गुड न्यूज’, जाणून घ्या

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – नाराजांना शांत करून भाजपने अखेर सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील सत्ता कायम राखण्यात आज यश आले. महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या गीता सुतार तर उपमहापौरपदी आनंदा देवमाने विजयी झाले. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांचा 43 विरुद्ध 35 मतांनी पराभव केला. आघाडीच्या उमेदवार वर्षा निंबाळकर यांचा पराभव केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी धक्का बसलेल्या भाजपला खूप दिवसांनी गुड न्यूज मिळाली आहे.

महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी आज पार पडलेल्या विशेष महासभेत पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे सीईओ अभिजित राऊत यांनी काम पाहिले. यावेळी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार गीता सुतार आणि काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार वर्षा निंबाळकर यांच्यात लढाई झाली. तर उपमहापौर पदाच्या निवडीत सुद्धा भाजपचे आनंदा देवमाने आणि आघाडीचे योगेंद्र थोरात यांच्यात निवडणूक झाली.

भाजपमध्ये महापौर, उपमहापौर उमेदवरांवरून नाराजी होती. याचा फायदा घेत काँग्रेसने नाराज सदस्यांना हाताशी धरण्यास सुरुवात केली. मात्र, ही बाब भाजपच्या लक्षात येताच अर्ज भरल्यानंतर इच्छूक नाराज सदस्यांना गोवा येथे सहलीसाठी पाठवून दिले. त्यांच्यासोबत कोअर कमिटीचे नेते माजी आमदार दिनकर पाटील, सुरेश आवटी, सुयोग सुतार हे स्वत: या सदस्यांसोबत होते.