‘जो बायडेन हे पुण्याचे पूर्वीचे भिडे’; गिरीश बापट यांची टोलेबाजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जगाच्या पाठीवर कुठे काही होऊद्या आमच्या पुण्याचे लोक इतके हुशार आहेत की, त्या व्यक्तीचा आणि पुण्याचं कनेक्शन कसे हे लगेच जोडतात. अमेरिकेत राष्ट्रपती पदाची निवडणूक झाली. जो बायडेन राष्ट्रपती झाले. तर लगेच एका पुण्याच्या व्यक्तीने जोडले राष्ट्रपती जो बायडेन हे पुण्याचे पूर्वीचे भिडे होते, असे किस्से सांगत खासदार गिरीश बापट यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात जोरदार टोलेबाजी केली.

अटल संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त यंदाचा अटल संस्कृती गौरव पुरस्कार शास्त्रज्ञ आणि पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजपाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना गिरीश बापट म्हणाले की जगाच्या पाठीवर कुठे काही होऊद्या आमच्या पुण्याचे लोक इतके हुशार आहेत की, त्या व्यक्तीचा आणि पुण्याचं कनेक्शन कसे हे लगेच जोडतात. अमेरिकेत राष्ट्रपती पदाची निवडणूक झाली. जो बायडेन राष्ट्रपती झाले. तर लगेच एका पुण्याच्या व्यक्तीने जोडले राष्ट्रपती जो बायडेन हे पुण्याचे पूर्वीचे भिडे होते. अहो इंदिरा गांधी पुण्याच्या हुजुरपागा शाळेत शिकल्या आणि बरं का देवेंद्र तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले कारण तुमचे काका पुण्यात होते. म्हणजे पुणेकर हुशार आहेत, सगळं करून पुन्हा पुण्याशी नातं येतं, असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.