भाजपानं ‘ED’ मार्फत ‘NCP’ ला दिला ‘ट्रिपल बुस्टर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ईडी, सीबीआयचा धाक दाखवून भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील वजनदार नेत्यांना भाजपात येण्यास भाग पाडले. भ्रष्ट पार्टी म्हणून भाजपाच्या टीकेला उत्तर देणे राष्ट्रवादी काँग्रेसला अवघड जात होते. महत्वाच्या नेत्यांनी बाहेरचा रस्ता धरल्याने पक्ष व कार्यकर्ते विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच पराभवाच्या मानसिकतेत गेले होते. पण, नेत्यांवर जो प्रयोग केला तोच प्रयोग आततायीपणे शरद पवार यांच्यावर करण्याचा प्रयत्न भाजपाने केला आणि आज तो त्यांच्या अंगाशी आल्याचे दिसून आले. अगदी शिवसेनेनेही उघडपणे शरद पवार यांचे समर्थन केल्याने सर्वच बाजूने सरकार अडचणीत आल्यासारखी स्थिती निर्माण झाली. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर सामान्यांनाही पवार यांच्यावरही हा प्रयोग आवडलेला नाही. भाजपाचा हा प्रयोग त्यांच्यावरच उलटला असून एक प्रकारे कोमात गेलेल्या राष्ट्रवादी पक्षाला आणि त्यांच्या कार्यकत्यांना भाजपाने ईडी हा ट्रिपल बुस्टर दिला आहे.

महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती बँकेतील २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत अजित पवार यांच्यासह ७० जणांवर उच्च न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला. त्यामुळे अधिक गर्भगळीत झालेली राष्ट्रवादी अजूनच कोमात गेली होती. विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाला. त्यानंतर ईडीने शरद पवार यांच्यासह सर्वांवर गुन्हा दाखल केला. त्यातून एकच हलकल्लोळ माजला. पवार यांच्या सांगण्यावरुनच अनेक गोष्टी होत असतात. पण त्यात कागदोपत्री कोठेही शरद पवार यांचे नाव रेकॉर्डवर नसते. त्यांच्या नावावर आजवर अनेक गोष्टी खपविल्या जातात. त्यातील काही नक्कीच खऱ्याही असतात.
शरद पवार यांच्याविरुद्ध अनेकांनी आजवर विविध गंभीर आरोप केले. पण कागदोपत्री ते कधीही सिद्ध करु शकले नाहीत. त्यामुळे जेव्हा ज्या सहकारी बँकेचे संचालक नव्हते. साधे सदस्यही नाहीत, तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रकार लोकांना रुचला नाही. त्यातूनच केवळ राष्ट्रवादीच नाही तर शरद पवारांचा वैचारिक विरोध करणारे प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेकांनी या प्रकाराचा निषेध केला. सामान्यांनाही पवार यांच्याविरुद्ध केलेली कारवाई पटली नाही. अगदी शिवसेनेनेही याचा विरोध केला.
शरद पवार यांना कितीही विरोध असला तरी आज ७८ वर्षी सुद्धा ते ज्या तडफेने काम करतात. आलेल्यांना त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करतात. दु:खात सामान्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करतात. याबद्दल विरोधकांच्याही मनात त्यांच्याविषयी आदर आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्यांनाही शरद पवार यांच्याविषयी आदर आहे. पक्षातून बाहेर पडल्यावर प्रत्येकांनी त्यांच्याविषयी चांगलेच बोलले. छत्रपती उदयनराजे यांनी तर पित्यानंतर साहेबांनी आपल्याला आधार दिला असे सांगताना त्यांचे डोळे पाणावले होते. राजकारणात ५० हून अधिक वर्षे काम केलेल्या नेत्याला एखाद्या गुन्हेगारासारखे ईडी कार्यालयात जाऊन ८ ते १० तास चौकशीला सामोरे जावे लागणार, या विचाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या मनात संताप निर्माण करण्यास कारणीभूत ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांविषयी कार्यकर्त्यांमध्ये चीड असली तरी शरद पवार यांच्याविषयी त्यांना ममत्व व आदर आहे.

मनातून निवडणुक हारलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये पवार यांच्यावरील ही कारवाई मनात अंगार चेतवणारी ठरली आहे. त्यातून जेव्हा शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात जाणार म्हटल्यावर या कारवाईचा निषेध करण्यासाठी विखुरलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एकजुट झाली. त्यांनी एकत्र येत उर्त्स्फुतपणे गावागावात निषेध, आंदोलन, बंद आयोजित केला. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले मरगळ दूर करण्यास मोठी मदत झाली आहे.

शरद पवार कोणतेही गोष्ट जाहीर करतात, तेव्हा ती कधीही पूर्ण करत नाही. त्यांना हवे तेव्हा त्याचा फायदा मिळाला की ते त्यातून परतीचा मार्ग शोधतात. आजही त्यांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याची घोषणा केली. तेव्हाच ते प्रत्यक्ष न जाता माहोल तयार करुन त्याचा राजकीय फायदा उठवतील पण, प्रत्यक्ष कार्यालयात जाणार नाहीत अशी अनेक दशके त्यांचे राजकारण जवळून पाहणाऱ्यांनी व्यक्त केली होती. ईडीने बोलवले नसताना ते जर तेथे गेले असते व ईडीने आपले दरवाजा बंद केले असते. तर दरवाजातून बाहेर परत येणे, हे त्यांनी गेल्या दोन दिवसात तयार केलेल्या माहोलला मारक ठरले असते. त्यामुळे त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारला.

ईडीनेही एक पाऊल मागे घेत त्यांना ईमेल केला व आता येण्याची जरुरी नाही. जेव्हा गरज पडेल, तेव्हा बोलावू, असे सांगून आपली मान तात्पुरती सोडवून घेतली. दुसरीकडे पोलीस सहआयुक्त विनय चौबे तसेच पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी त्यांची भेट घेऊन राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीची कल्पना दिली. आपली राजकीय ताकद अजूनही राज्यभर आहे, हे दाखवून देताना कार्यकर्ते चार्ज झाले हे पाहिल्यानंतर आपली खेळी यशस्वी ठरल्याचे दिसल्यावर शरद पवार यांनी कायदा सुव्यवस्था बिघडू नये, आपल्यामुळे लोकांना त्रास होऊ नये, म्हणून माघार घेत आपला डाव साधला.

भाजपाने ईडीचा केलेला प्रयोग त्यांच्यावरच उलटा आहे. या ईडी प्रयोगामुळे राज्यभरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चार्ज झाले. एकप्रकारे भाजपाच्या ईडी प्रयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला ट्रिपल बुस्टर दिला असल्याचे मानले जात आहे.