निवडणूकीपूर्वीच भाजपचे ‘तीन’ उमेदवार विजयी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेच्या निवडणूकीसोबतच चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत आहेत. या निवडणुकीपूर्वीच भाजपने तीन जागांवर विजय मिळवला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने विधासभा निवडणूकीपूर्वी तीन जागा जिंकल्या आहेत. याचा भाजपला आगामी लोकसभा निवडणूकीसाठी फायदा होणार आहे.

लोकसभा निवडणूकांसोबत अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. अरुणाचलमध्ये ६० जागा असून येथे काँग्रेसने ५३ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपची सत्ता असलेल्या या राज्यामध्ये ११ एप्रिलला मतदान होणार असून भाजपने आलो ईस्ट, यचुली आणि दिरांग विधासभा मतदारसंघातून निवडणूकीपूर्वीच विजय मिळवला आहे.

गृहराज्यमंत्री किरण जिजिजू यांनी ट्विटरवरून आलो ईस्ट येथून सर केंटो जिनी आणि यचुली येथून ताबा तेडीर या भाजप उमेदवारांनी बिनविरोध निवडणूक जिंकली असल्याची माहिती दिली आहे. आता दिरांग मतदारसंघातून भाजप उमेदवार फुरपा सेरिंग यांचीही बिनविरोध निवड पक्की झाली आहे. सेरिंग यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या दोघांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड पक्की झाली आहे. याबाबत अद्याप निवडणूक आयोगाने माहिती दिलेली नाही. परंतु, भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.