केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मोठा दावा, म्हणाले – ‘राज्यात लवकरच भाजपचे सरकार येणार’  

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कधीही एकत्र न येणा-या तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे या सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असून, वादविवाद सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही मोकळेपणाने काम करता येत नाही. त्यातच सन्मान मिळत नसल्याने काँग्रेसने पाठिंबा काढला तर पुन्हा एकदा राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार सत्तेत येईल, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

मंत्री आठवले रविवारी (दि. 7)  सातारा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात मध्यावधी निवडणूक होणार का, असा प्रश्न केल्यावर ते म्हणाले, मध्यावधी निवडणूक कोणालाही नको आहेत. पण भाजपकडे महाविकास आघाडीतील 27 ते 28 आमदार फुटून येतील. सध्या आमच्याकडे 117 आमदार आहेत. त्यामुळे राज्यात भाजपची सत्ता कधीही येऊ शकते, असे ते म्हणाले. मनसे नेते राज ठाकरे हे विनामास्क फिरतात. याबाबत आठवले म्हणाले, मास्क नसेल तर नेत्यांवरही कारवाई होणे गरजेचे आहे. राज ठाकरे हेही नेते आहेत. कदाचित त्यांना मुख्यमंत्री ठाकरेंचा आदेश मानायचा नसेल म्हणून ते मास्क वापरत नसतील.

मनसुख हिरेन यांची आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय आहे. मुकेश अंबानींचे घर उडविण्याचा हा कट असू शकतो. पोलीस अधिकारी वाझेंची वागणूक संशयास्पद असून, कोणालाही पाठीशी न घालता त्यांची चौकशी करण्याची मागणी आठवले यांनी केली. शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका केंद्र सरकारची आहे. केंद्राने केलेले कृषी कायदे शेतक-यांच्या फायद्याचे आहेत. तरीही कायदे मागे घ्या म्हणणे चुकीचे आहे. शेतकरी नेतेही ऐकायला तयार नाहीत. कायदे मागे घेण्यापेक्षा त्यात बदल करण्याची मागणी त्यांनी करावी असे ते म्हणाले.