बहुमत सिध्द करण्यासाठी भाजपची रणनिती तयार, आशिष शेलारांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या पाठिंब्याने सत्ता स्थापनेचा दावा केला. तसेच घाईगडबडीत भाजपने शपथविधी उरकला. आज वसंतस्मृती येथे भाजपच्या आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. येत्या ३० नोव्हेंबर रोजी विधानसभेत होणारा विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकण्यासाठी आजच्या बैठकीत रणनीती आखण्यात आल्याची माहिती भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज दिली. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शेलार यांनी ही माहिती दिली.

शिवसेनेवर निशाणा साधताना शेलार म्हणाले, राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट जनादेश दिला. मात्र, शिवसेनेने जनदेशाचा अपमान केला आहे. मागील 30 वर्षापासून शिवसेना आणि भाजपने युती करून काम केले. बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने महायुतीने राज्यात काम केले. मात्र, आज शिवसेनेने बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. शिवसेनेचा त्यांच्याच आमदारांवर विश्वास नाही. त्यामुळेच त्यांनी आमदारांना एकत्र ठेवले आहे. मात्र आमचा आमच्या आमदारांवर विश्वास आहे. आमदारांवर विश्वास ठेवू शकत नसलेला कोणता पक्ष असेल तर तो शिवसेना असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

येत्या 30 नोव्हेंबरला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला. तसेच आजच्या बैठकीमध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव एकमताने मंजुर करण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी अजित पवार यांचे अभिनंदन केले होते. त्यावर रविवारी दुपारी अजित पवार यांनी धन्यवाद दिले. तसेच स्थिर सरकार देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी ट्विट करत मोदी यांना विश्वास दिला.

Visit : Policenama.com